मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात मुसळधार पाऊस पडत नसल्याने लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये आज केवळ ३३ टक्के जलसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प १८ ऑगस्ट रोजी कोरडी आहेत. त्यामुळे सर्वांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला. आता पावसाचे केवळ ४३ दिवस शिल्लक आहेत. मराठवाड्यात सर्वदूर धो धो पाऊस पडला नाही. जायकवाडीसह ११ मोठी प्रकल्प आहेत. आजपर्यंत झालेल्या पावसाच्या कालावधीत केवळ ३१ टक्के जलसाठा झाला आहे. सर्व मोठ्या धरणांत सरासरी ३३ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे मध्यम आणि लघू प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. सर्वाधिक वाईट परिस्थिती छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आहे.
संभाजीनगरात १६ मध्यम प्रकल्प असून १३ धरणे पाण्याअभावी कोरडी आहेत. उर्वरित धरणांतही सरासरी ५.२६ टक्के जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये सुमारे ७६ टक्के पाणी होते.
मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा
मोठे प्रकल्प ११ - ३३%
मध्यम प्रकल्प ७५ - ३३%
लघु प्रकल्प ७५० - ३०%
जालन्यातील आठ प्रकल्प शून्यावर
• जालना जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत.
• बीड जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पापैकी ८ धरणांमध्ये पाण्याचा थेंबही नाही.
• बीडच्या काही भागात पाऊस पडला होता.
• यामुळे एकूण प्रकल्पांत सरासरी ३६ टक्के पाणी आहे.
• लघु प्रकल्पातही २५ टक्के पाणी आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी २५% पाणी
• लातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सरासरी २५ टक्के पाणी आहे. गतवर्षी ९ टक्के पाणी होते.
• धाराशिव जिल्ह्यात १७ मध्यम प्रकल्प असून यात ३१ टक्के पाणीसाठा आहे.
• नांदेड जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही बऱ्यापैकी पाऊस पडल्याने धरणात सुमारे ८३ टक्के पाणीसाठा आहे.
• परभणी जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प असून यात सरासरी ६९ टक्के पाणी आहे.