Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला

मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला

Marathwada will receives below average rainfall till September 7; Agro advise for crop management | मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला

मराठवाड्यात ७ सप्टेबरपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस; विद्यापीठाने दिलाय हा कृषीसल्ला

मराठवाडयात दिनांक 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 ते 31 ऑगस्ट 2023 व दिनांक 01 ते 07 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषिहवामान आधारीत कृषिसल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पावसाच्या खंड काळात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास खरीप ज्वारी, बाजरी पिकास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.

खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस व हळद पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. पावसाच्या खंड काळात ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% याप्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.

अंबे बहार धरलेल्या मोसंबी फळबागेत फळगळ थांबविण्यासाठी 100 लिटर पाण्यात एक किलो यूरिया + 30 मिली प्लॅनोफिक्स द्रावणाची फवारणी करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 13:00:45 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळींब फळबागेत फळवाढीसाठी 13:00:45 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा  पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे 15 ते 20 वर्षा पर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा 140 कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट 170 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 कि.ग्रॅ. म्यूरेट पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे. जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 क्विंटल प्रमाणे एकूण 8 क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवीचे खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दत लागवडीत बरू किंवा ढेंचा हे द्विदल पीके पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गांडूळ टाकणे.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

किटकनाशक फवारतांना विविध रसायने मिसळून न फवारता एका किटकनाशकाची एका वेळी फवारणी करावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: Marathwada will receives below average rainfall till September 7; Agro advise for crop management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.