अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची १५ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारनेकर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चारही राज्यांचा या धरणाची उंची वाढविण्याला विरोध असल्याने अलमट्टीचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
अलमट्टीची उंची वाढविण्याला कृष्णा पाणी वाटप लवादाने परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढविण्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली.
यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री पाटील यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.
ते म्हणाले, कर्नाटकला सध्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी पुरवण्याला अग्रक्रम देण्यात आला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावर कर्नाटक सरकार ठाम आहे.
कृष्णा पाणीवाटप लवादाने ५२४ मीटरपर्यंत उंची वाढविण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी करावी, अशी मागणी कर्नाटकने मंत्री सी. आ. पाटील यांच्याकडे केली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटकच्या निर्णयाविरोधात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हा प्रश्न न्यायालयीन वादातही अडकला आहे.
या दोन्ही राज्यांची समजूत काढून कर्नाटकला अलमट्टीची उंची वाढविण्याला परवानगी द्यावी. तशी अधिसूचना जारी करावी, असे आवाहन या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांना केले. त्यावर सर्व संबंधित राज्यांचे या प्रश्नावर एकमत घडवून आणण्यासाठी येत्या पंधरा दिवसात केंद्र सरकार बैठक बोलावेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महाराष्ट्राचा विरोध तोंडीच
• अलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनते. विशेषतः सांगली, मिरज आणि शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते.
• त्यामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचही प्रचंड नुकसान होते. जीवितहानीचाही मोठा धोका असतो. ५१९ मीटर उंची असताना ही स्थिती आहे.
• जर अलमट्टीची उंची सहा मीटरने वाढवून ती ५२४ मीटर केली तर महापुराच्या पाण्याची फूग आणखी वाढून स्थिती भयावह होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढविण्याला या दोन जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे.
• महाराष्ट्र सरकारनेही अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटकच्या निर्णयाला विरोध केला जाईल, असे म्हटले. तशी आश्वासने अनेक मंत्र्यांनी दिली आहेत. पण हा विरोध तोंडीच आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेली नाही.