मागील पंधरा दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अनेक भागात कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कमाल तापमान ४४ अंशांवर जाऊन उच्चांकी नोंद झाली होती. यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन मंगळवारी झालेल्या हलक्याशा रिमझिम पावसाने कमाल तापमानात पाच अंशांनी घट येऊन बुधवारी ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात मार्च महिन्याच्या मध्यानंतर कमाल तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत जाऊन कमाल तापमान हे ४४ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाही लाही होत होती. यातच किमान तापमान हे २७.५ अंशांवर पोहोचल्याने दिवसभर आगीतील उकाडा कमी होत नव्हता. अशा परिस्थितीत मंगळवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण तयार होऊन अचानक हलका रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे या वर्षातील उच्चांकी स्तरावर गेलेले ४४ अंशांचे तापमान हे खाली घसरत ३९ अंशांपर्यंत आल्याची नोंद झाली असल्याचे औराद शहाजानी हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
सततच्या वाढीव तापमानामुळे परिसरातील तेरणा, मांजरा नदीतील सर्व बंधारे कोरडे पडले असून, लघु- साठवण तलाव कोरडे पडलेले आहेत. अशा परिस्थितीत तब्बल पाच वर्षांनंतर या भागांमध्ये पुन्हा एकदा दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. यातच प्रशासनाने नदीकाठच्या तब्बल २५ गावांतील मागणीप्रमाणे विंधन विहिरी अधिग्रहण प्रस्ताव मंजूर केले असून, पुढील काळात एप्रिल व मे, जून अशा दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी हा उन्हाचा कालावधी आहे. उन्हाची तीव्रता वाढत गेली तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.