Join us

हवामान खात्याने दिला अलर्ट; उत्तर आणि मध्य भारताला भरणार हुडहुडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 12:05 PM

तापमान शून्याच्या खाली, तरीही नववर्षाचा जल्लोष

नव्या वर्षाचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, उत्तर भारतातील अनेक भागात नव्या वर्षाचा पहिलाच दिवस गेल्या चार वर्षांतील गारेगार ठरला. उत्तर भारतातील अनेक राज्यांना थंडीमुळे हुडीहुडी भरली आहे. विशेषत: पंजाब, हरयाणा या भागात तापमान घसरले आहे. जम्मू- काश्मिरसह, हिमाचल प्रदेशात पर्यटक हिवाळ्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र आहे. तथापि, मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंड हवामान होते. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये किमान ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहाटे दोन्ही राज्यांमध्ये काही ठिकाणी धुकेही दिसून आले.

जानेवारीमध्ये पारा घसरणार

• भारतीय हवामान खात्याने देशाच्या मध्यवर्ती भागात जानेवारीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे.

• भारतीय हवामान विभागाचे महासंचालक एक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

तापमान शून्याच्या खाली, तरीही नववर्षाचा जल्लोष

श्रीनगरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमान असूनही, शेकडो स्थानिक लोक व पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाल चौकातील प्रतिष्ठित क्लॉक टॉवरवर गर्दी केली होती, असे दृश्य यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. स्थानिक लोक आणि पर्यटकांनी नववर्षाचा आनंद लुटला.

कुठे किती अंशांपर्यंत उतरला पारा?

फरीदकोटमध्ये ८ अंश सेल्सिअस, लुधियानामध्ये ८.२ अंश सेल्सिअस आणि अमृतसरमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हरयाणातील कर्नाल येथे ८.१ अंश सेल्सिअस तर हिस्सार, नारनौल आणि भिवानी येथे अनुक्रमे ८.३, ८.८ आणि ८.३ अंश सेल्सिअस तापमान होते.

गेले वर्ष १२२ वर्षांतील सर्वात उष्ण

■  महापात्रा म्हणाले की, २०२३ हे १९०१ नंतरचे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते. कारण देशातील वार्षिक सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते. १९०१ नंतरचे सर्वात उष्ण वर्ष २०१६ नोंदविले होते.

■ तेव्हा देशातील वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.७१ अंश सेल्सिअस जास्त होते. देशाच्या बहुतांश भागांमध्ये सकाळी तुलनेने उष्णतेची अपेक्षा आहे.

■ मध्य आणि वायव्य भागांमध्ये थंड दिवसांचा अनुभव येईल. कारण हवामान विभागाने या प्रदेशात सामान्य कमाल तापमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

टॅग्स :हवामानतापमान