जत : म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून अखेर जत तालुक्यात शुक्रवारी पाणी दाखल झाले. कुची बोगद्यातून डोर्ली येथून कुंभारी गावात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जत तालुक्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार म्हैसाळ योजनेतून बारा दिवसापूर्वी पाणी सोडण्यात आले. अखेर जत तालुक्यात दहा-बारा दिवसांनी पाणी दाखल झाले.
म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले आहेत. मिरज, कवठेमहांकाळ, मार्गे जत तालुक्यात पाणी दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यात उन्हाचा तडाका जाणवू लागल्याने पिके माना टाकत होती.
मात्र म्हैसाळ सिंचन योजनेतून आलेल्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पाणी पोहोचणाऱ्या सर्व भागातील तलावे, बंधारे, नालाबांध भरून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
कुंभारी गावानेही पाणी सोडण्याची मागणी केली होती. दरम्यान, जत तालुक्यात मुख्य कॅनॉलपासून सुरू होणाऱ्या अनेक बंदिस्त पाइपलाइन उपयोजनांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत.
या योजनातूनही पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या योजनांच्या माध्यमातून लाभ क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जमिनी ओलिताखाली येणार आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
अधिक वाचा: मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कसा राहील उन्हाळा? काय सांगतोय हवामान अंदाज