Join us

Maharashtra Monsoon Alert: आज विदर्भात मुसळधार; नगर, पुण्यासह १६ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 13, 2024 9:26 AM

Maharashtra Monsoon Alert: विदर्भात पुढील पाच दिवस पाऊस मुक्कामी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात येत्या २४ तासांत..

राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाने (IMD Monsoon Alert) सांगितले. संपूर्ण विदर्भात माेसमी पावसाने हजेरी लावली असून पुढील सलग पाच दिवस विदर्भात पाऊस मुक्कामी आहे. हवमान विभागाने विदर्भासह १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात हलक्या व मध्यम सरींच्या शक्यता आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस होणार असून पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पावसाची रिपरिप वाढेल, असा अंदाज देण्यात आला आहे.

दरम्यान आज दि १३ जून रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून नगर, पुण्यासह राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

आज संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महराष्ट्रात नगर, पुणे सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात धाराशिव, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून बीड नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या व मध्यम सरींची हजेरी लागेल.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसवादळमहाराष्ट्र