पुणे : मान्सूनने सोमवारपर्यंत (दि.१०) मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील बहुतांशी भाग व्यापला असून, उर्वरित भागामध्ये प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये पुढील दोन-तीन दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे. मंगळवारी (दि.११) कोकण व उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने होत असल्याचे चित्र असून, मान्सूनने राज्यातील काही भाग वगळता संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्हा व्यापला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, जालना, परभणी, डहाणू या भागातही प्रवेश केला आहे.
दोन दिवसांमध्ये मान्सून उर्वरित भागात प्रवेश करेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मंगळवारी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
११ जून रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडा वगळता उर्वरित जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० प्रतितास राहील. या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १२ व १४ जूनदरम्यान विदर्भात काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
सोमवारचा पाऊस
पुणे : ७.६ मिमी
महाबळेश्वर : १५ मिमी
सांगली : ५ मिमी
रत्नागिरी : ०.२ मिमी
धाराशिव : २ मिमी
परभणी : ०.२ मिमी
बीड : ०.२ मिमी
अमरावती : २ मिमी
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर