Join us

Monsoon Forecast: यंदाच्या मॉन्सून अंदाजावर पेरणी करताय? मग त्याआधी हे वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 4:06 PM

Monsoon forecast and Kharif sowing : किकुलॉजी भाग २९: यंदा मॉन्सून अंदाजाच्या भरवशावर पेरणी करताय? सावधान, हे आधी वाचाच.

राजस्थानात जैसलमेर तापमान ५५ अंश सेल्सिअस पोहोचले आहे. तर याच राज्यातील फालोदी येथे तापमान ५२ अंश सेल्सिअसच्या पलीकडे, महाराष्ट्रात जळगावचे, भुसावळचे, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी अनेक राज्यांत तापमान ४८ अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचले.  यवतमाळ, अकोला, वर्धा, परभणी, नागपूर, अमरावती, ४६ अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचले आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पलीकडे पोहोचले आहे.  हे वास्तव नाकारण्यासारखे नाही. याशिवाय दिल्ली, पंजाब, राजस्थान हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश ही राज्ये भाजून निघत आहेत.

सूर्य मावळल्यानंतर देखील ४० अंश सेल्सिअसच्या पलीकडे राहणारे तापमान हे उष्माघाताच्या रूग्णांची संख्या २० हजारापेक्षा अधिक व १०० पार करणारी मृत्यूंची संख्या ही चिंता वाढणारी आहे. जळगाव जिल्ह्यातील थेरोळा (मुक्ताईनगर) येथे १०० पेक्षा मेंढ्यांचा तसेच शेकडो कोंबड्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे.‌ 

पर्जन्य! 'पर्जन्य' या शब्दाचे अनेक अर्थ संदर्भ विविध प्राचीन ग्रंथात आढळतात, मुळ संस्कृत असलेला हा शब्द बनला आहे तो, पर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आणि जन्य म्हणजे जन्म घेणारा! थोडक्यात पाऊस म्हणजे ती जलवृष्टी, जिचा जन्म अन्य ठिकाणी होतो. आता हे अन्य ठिकाण म्हणजे अर्थातच महासागर, समुद्र असे जलाशय होय. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ एका ठिकाणी होते आणि चारा हे बाष्प वाहून दुसरीकडे नेतो; मग पाऊस बरसतो तो अन्य ठिकाणी!

एल निनो, ला निना आणि आंतरराष्ट्रीय कृषी अर्थकारण व राजकारण मान्सून आणि एल निनो यांचा संबंध आहे, या चुकीच्या गृहितकावर आजवर अनेक अंदाज देत नाहक भारतीय शेतकऱ्यांना घाबरवत आंतरराष्ट्रीय कृषी अर्थकारण व राजकारण होत आले आहे. कळत-नकळत देशासोबत प्रताडना करत फक्त भारतीय अधिकृत-अनाधिकृत संस्थाच नव्हे, तर परदेशी संस्था देखील एल निनोचा आधार घेऊन मान्सून कसा कमी होईल याबाबत हवे तसे अंदाज बांधत बातम्यांची पेरणी करत शेअर मार्केट नियंत्रणासाठी दावपेज आखतात. 

एल निनो आणि ला निना हे अनुक्रमे उष्ण व थंड सागरी प्रवाह आहेत. (अधिक माहितीसाठी किकुलॉजी भाग २७ वाचावा)  एल निनो हा स्पॅनिश शब्द, एल निनो हे ख्रिस्ताचा मुलगा तर‌ ला निना या स्पॅनिश म्हणजे ख्रिस्ताची मुलगी अशी मच्छीमारांनी दिलेले स्पॅनिश नावे होय. एल निनोचा प्रभाव संपला की थंड प्रवाह ला निनाचा जन्म होतो. 

एल निनो हा पेरूच्या पश्चिमी किनारपट्टीपासून २०० किलोमीटरवर उत्तरेकडून दक्षिण दिशेला वाहणारा विषववृत्ताला समांतर होत जाणारा उष्ण पाण्याचा सागरी प्रवाह आहे.मान्सूनचा अंदाज वर्तचिताना एल निनोला व ला निनाला अवास्तव महत्व दिले गेले आहे असे जाणवते. मान्सून आणि एल निनो किया ला निना यांचा काहीएक संबंध नाही. 

सागरात अर्थातच हजारो जलप्रवाह आहेत. यात शेकडो जलप्रवाह हे थंड आहेत, तर शेकडो उष्ण प्रवाह आहेत. महर्षी गर्ग, पराशर, कश्यप, सिद्धसेन, बादरायण, देवल, असित व वशिष्ठ अशा अनेक आचार्य व महर्षीनी मान्सून व पर्जन्य प्रारंभाविषयी पद्धती सांगितल्या आहेत. इसवी सन सहाव्या शतकात उज्जैन येथे जन्मलेल्या आचार्य वराहमिहीर यांनी मान्सून अंदाज वर्तविण्याचे अनेक निकष सांगितले आहेत; मात्र त्यात सागरी प्रवाह म्हणजे एल निनो व ला निनाचा जरादेखील संबंध मांडण्यात आलेला नाही, असे असले तरी १९५ दिवस आधी म्हणजे साधारणतः साडे सहा महिने आधीच्या वातावरण स्थितीवरून मान्सून आगमन कसे होईल, याची माहिती देता येते हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जगातील वेगवान वाढ होणारी पाचवी अर्थव्यवस्था म्हणजेच कृषीप्रधान भारत देश होय. अशावेळी अन्नसुरक्षितता हा जगाला भेडसावणारा प्रश्न होय. सर्वात जास्त म्हणजे ६५ टक्के तरुणांचे क्रियाशील मनुष्य बळ व सुपिक शेती असलेल्या भारताकडे जगातील देश मोठ्या आशेने पहात आहेत. आपल्या 'अर्थपूर्ण' व 'अन्नपुरती' लाभासाठी वक्रदृष्टी टाकणाऱ्यांतर्फे एखादे कटकारस्थान होत आहे की कसे? याबद्दल आपण खातरजमा करून, जागृत रहात शेती नियोजन गरजेचे आहे.

उष्णतेचा मारा अन् लोडशेडिंगमुळे संतापाच्या धारा! उष्णतेचा मारा अन् लोडशेडिंगमुळे संतापाच्या धारा अशी आजची महाराष्ट्रासह देशात इतरही राज्यात परिस्थिती आहे.‌ २०२२ सालच्या आकडेवारीनुसार भारतात दरडोई विजेचा वापर सुमारे १.३ मेगावाट-तास इतका होता. धरणातील घटलेला पाणीसाठा, पाणी टंचाई बरोबरच उष्णतेने वाढलेली म्हणजे महाराष्ट्रातील २६ हजार मेगावॅट विजेची मागणी असतांनाच, महाराष्ट्रातील १७ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. विजेच्या यातील तफावतीमुळे वारंवार विद्युत भारनियमन होत आहे. तांत्रिक बिघाड, देखभाल दुरूस्ती या नावाने अघोषित लोडशेडींगचा खेड्यापाड्यात आणि शहरांतील जनतेला देखील फटका बसत आहे. सरकारी किंवा खासगी रूग्णालयात विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने, ऑक्सिजन व इतर यंत्रणा खंडीत होत होणारे मृत्यू हे तापमान वाढी अंतर्गत नोंदवले जात नाहीत हे सत्य आहे. 

उष्णतेने गुन्हेगारी, घटस्फोट व गृहयुद्धाचा धोका! नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिकल रिसर्चच्या २०१९ साली प्रकाशित अहवालानुसार गंभीर हिंसक गुन्हेगारीचे प्रमाण हे उष्णता वाढीने सुमारे ६ टक्के इतके वाढते. परिणामी भारतच नव्हे तर आफ्रिका, ब्रिटन, अमेरिकेसारख्या आदी देशात देखील उष्णतेने जनता बेकाबू होत गृहयुद्ध भडकण्याचा धोका हा ५४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे, तसेच गृहकलह वाढत घटस्फोटाचे प्रमाणही उष्णतेबरोबर वाढते आहे हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे.

१०६ टक्के मान्सूनवर भरंवसा हाय का?१०६ टक्के मान्सूनवर भरंवसा हाय का? असे आज शेतकरी विचारत आहे, कारण अधिकृत यंत्रणांना सामान्य जनतेत आपली विश्वासार्हता मिळविण्यासाठी दूरचा पल्ला गाठायचा आहे. मान्सून १०६ टक्के बरसणार या गृहितकावर महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ असतांनाही स्मार्ट सिटीसह रस्ते व इतर इमारतींची बांधकामे, वाहने वॉशिंग सेंटर्स आदींना परवानगी देत पाण्याची वारेमाप उधळपट्टी होत आहे. 

१०६ टक्के जोरदार मान्सूनच्या खोट्या बातम्यांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, तर आपल्याकडे उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पिकपेरणीचा स्वानुभवाने निर्णय घ्यावा. जोरदार पावसावर विसंबून राहत‌ जिराईत जमिनीवर जास्त पाण्याची पिके घेणे जोखमीचे ठरू शकते, तसेच शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, पाणी व पैसा वाचवत येणाऱ्या परिस्थितीचा धैर्याने सामना करणे गरजेचे आहे. आचारसंहितेच्या नावाखाली दुष्काळ दुर्लक्षित करणे आत्मघातकी ठरू शकेल. अन्नसुरक्षा व जनावरांचा चारा याबाबत गांभीर्याने धोरणात्मक कृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.

अंदाजांची 'गाजर पुंगी'! कागदोपत्री मान्सून १ जूनला सुरू होऊन ३० सप्टेंबरला संपतो. महाराष्ट्रातील जलसाठा २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ७५ टक्के महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडलेला आहे. असे असतांना देखील, यंदा मान्सून १०६ टक्के बरसणार या अधिकृत अंदाजावर आज पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. 

खरंतर अंदाज म्हणजे 'गाजर पुंगी' होय. अंदाज म्हणजे खात्री नव्हे तर गाजराचा पुंगी होय, वाजली तर वाजली नाही तर खाऊन टाकली! 'अंदाज' हा शब्द वापरला म्हणजे रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे दिलेल्या माहितीची खात्रीपुर्वक जबाबदारी घेणे व परीणामांची अकाउंटिबिलीटी म्हणजे उत्तरदायित्व यातून कायदेशीर पळवाट काढत पळपुटा मार्ग काढता येतो. 

यंदाचा मान्सून आणि पिकपेरणी निर्णय कोरडा दुष्काळ असतांना महागडे बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदीवरील खर्च वाया जावू नये यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. यंदा देखील मान्सून लांबणार व मागील वर्षीपेक्षा कमी बरसणार असल्याचे वैज्ञानिक निष्कर्ष अभ्यासात मला आढळून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पेरणी नियोजन व पीक निवड बदललेल्या हवामानानुसार करणे गरजेचे आहे. 

सूर्यावरील चुंबकिय वादळे व उठणारे सौर धुमारे यांचा खोलवर परिणाम जागतिक पातळीवर आणि भारतात तसेच महाराष्ट्रात देखील तापमानवाढीच्या स्वरूपात होत आहे. महाराष्ट्रात मे, जून व जुलै मध्ये पूर्व मान्सून सारखा विजांच्या कडकडाटासह भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस बरसणार आहे. मात्र, या वळीवासारख्या पावसाला मान्सूनचा पाऊस समजण्याची गल्लत शेतकऱ्यांनी केली तर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. 

परिणामी आर्थिक फटका बसू शकतो. त्यात शेतकऱ्यांनी चुकीच्या वेळी चुकीच्या पिकाची निवड करीत पिक-पेरणी केल्यास नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा मान्सूनचे पर्जन्यमान अन् शेती-अर्थव्यवस्थेचे नियोजन भान याबाबत शेतकरी बांधवांनी सजग असणे आवश्यक व अपरिहार्य आहे.

-- प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, नाशिक ४२२००९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत. शेतकऱ्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)

टॅग्स :मोसमी पाऊसखरीपपाऊसशेती क्षेत्र