मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राला चकवा देणाऱ्या मान्सूनसरींनी अखेर रविवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पुढील ७२ तासांसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, उत्तरेकडील अनेक राज्यांत पावसाने दाणादाण उडविली असून पुढील चार दिवस २३ राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात चांगला पाऊस झाला. विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्राव्यतिरिक्त मान्सून मध्य अरबी समुद्र, उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातचा काही भाग, राजस्थान आणि हरयाणाचा काही भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आली.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत मान्सून गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरयाणात दाखल होण्यासाठी हवामान अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
मान्सूनने २५ जूनला मुंबईसह महाराष्ट्र व्यापला आहे. संपूर्ण राज्याची मान्सूनची सरासरी तारीख १५ जून आहे. मान्सून आता राज्याची सीमा ओलांडून आणखी वर सरकला आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र
ऑरेंज अलर्ट कुठे?
सोमवार : रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया.
मंगळवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अमरावती, नागपूर. बुधवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक.
- दिल्ली - महाराष्ट्रात ६२ वर्षांनंतर एकत्र
- रविवारी सकाळी मान्सूनने दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रवेश केला.
- आयएमडीच्या माहितीनुसार ६२ वर्षांनंतर मान्सून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पोहोचला आहे.
- यापूर्वी २१ जून १९६१ रोजी मान्सूनने एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी प्रवेश केला होता.
मान्सूनची आभाळमाया, २३ राज्यांत बरसणार
अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे देशभरात बहतांश भागात मान्सून जोरदार सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस देशातील सुमारे २३ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकच दिवशी महाराष्ट्रासह ६ राज्यांमध्ये तो धडकला. आयएमडीनुसार, मान्सूनने महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिशा, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा राज्य व्यापले आहे.
लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरच्या मोठ्या भागांसह उत्तर भारतातील बहुतांश भागात मान्सून वेळापत्रकानुसार किंवा किंचित आधी पोहोचला आहे. मध्य भारतातील काही भागाला मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अनेक वाहने वाहून गेली.
आसाममध्ये शेकडो गावे पाण्याखाली
सध्या १,१९८ गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये ८,४६९.५६ हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे, असे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. मुसळधार पावसामुळे चार लाखांहून अधिक लोकांना महापुराचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.