Join us

Monsoon: नाशिक जळगावमध्ये पाऊस, गिरणा खळाळली, पेरण्यांनाही आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:15 PM

Kharif Seaon Sowing after Monosoon rain नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात काल पाऊस पडला, तर जळगावसह जिल्ह्यातील काही तालुक्यांत दमदार पाऊस पडल्याने गिरणा नदी खळालली असून पेरण्यांना वेग आला आहे.

दिनांक ८ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला असून जळगाव नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने (monsoon rain)  हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची शेतातील कामे (Kharif sowing) सुरू झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मागील वर्षी पावसाने सुरुवातीला हजेरी लावली. त्यानंतर मात्र ऐन पावसाळ्यात पाठ फिरवल्याने परिसरातील नदी नाले कोरडेठाक पडले होते. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही अपेक्षित उत्पादन न झाल्याने उत्पन्न घटले होते. यावर्षी हवामान खात्याने वेळेवर पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बळीराजाने गत महिन्यात शेतातील मशागतीची कामे आटोपून घेतली आहे. पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील उष्मादेखील काही प्रमाणात कमी झाला आहे. प्रथमच मृग नक्षत्राची सुरुवात समाधानकारक झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पेरणीयोग्य पाऊस होताच शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी केली जाते. पेरणीसाठी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी बघावयास मिळत आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने बियाणे व रासायनिक खतांच्या खरेदीवरही परिणाम झाला होता. यंदा सुरुवातीलाच चांगला पाऊस पडला असल्याने बी-बियाणे व्यावसायिकांकडे गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

सिन्नर परिसरात चांगला पाऊस सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह मृग नक्षत्राच्या पावसाची हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. 

मनमाडमध्ये वीज पडून तरुण दगावलामनमाडसह पानेवाडी परिसरात विजेच्या कडकडाटात मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पानेवाडी, शास्त्रीनगर, कऱ्ही, एकवई, खादगाव, अस्तगाव परिसराला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पहिल्याच पावसाने नदी- नाल्यांनी पाणी वाहिले आहे. तर शेतात सकल भागात पाणीच पाणी झाल्याने खरिपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर खादगाव येथे वीज अंगावर पडून विलास गायकवाड हा तरुण जागीच ठार झाला.

जळगावात पावसाची दमदार सलामी जळगाव  जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल व जामनेर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. रविवारीदेखील जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी रात्री जिल्ह्यातील म्हसावद, रिंगणगाव, वाकडी व नांद्रा या चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. दमदार पावसामुळे गिरणा खळाळून वाहू लागली आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत आठ दिवसांअगोदरच मान्सून दाखल झाला आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच जून महिन्यात दमदार पाऊस आतापर्यंत झालेला आहे. सोमवारी जिल्ह्यात १७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यातील एकूण पावसाची सरासरी ही ५८ मिमीपर्यंत पोहोचली आहे. रविवारी तापी पट्ट्यात दमदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी गिरणा पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाचोरा, एरंडोल, जामनेरसह जळगाव तालुक्यातदेखील चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली होती. मात्र, रविवारी व सोमवारी झालेल्या पावसानंतर जिल्ह्यात मका, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पेरण्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. ७० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या असून, अजून दोन दिवस पाऊस झाल्यास दोन दिवसांत जिल्ह्यात १ लाख हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकतात. मात्र, आता पाऊस झाला असला तरी काही दिवस पाऊस ब्रेक घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसपाऊस