Join us

आनंदवार्ता! राज्यात मॉन्सून मंगळवारी, पुण्यात गुरुवारी प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 9:14 AM

पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

उन्हाच्या कडाक्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात नागरिकांचे हाल होत असून, बहुतांश शहरांतील कमाल तापमान चाळिशीपार नोंदवले जात आहे. काही भागांत तर तापमान ४५ अंशांवर गेले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत. पण आता लवकरच मान्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. तसेच मॉन्सून लवकर दाखल होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यात सूर्य चांगलाच तळपत आहे. त्या ठिकाणी अक्षरशः आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त आहे. त्यामुळे मान्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. येत्या ४ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज आहे.

'रेमल' या चक्रीवादळाच्यामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मान्सूनला कुठेही अडथळा येणार नाही. मान्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारीतीने होणार आहे. मान्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील.

मध्य महाराष्ट्रात २ ते ५ जूनपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात २ ते ५ जून नांदेड, धाराशिव, लातूर येथे, तर ३ ते ४ जून रोजी बीड जिल्ह्यांत वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल.

जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मान्सूनचा समजला जाईल. राज्यात काही भागात मान्सून पोहोचलेला नसला, तरीदेखील तो पाऊस मान्सूनचा असेल. सध्या प. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी दाखल होऊ शकेल.- डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे

उष्णतेची लाट !

  • पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
  • विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येईल.
  • ४ जूनपासून रत्नागिरीत वादळवाऱ्यासह पाऊस पडेल. ५ जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांत येलो अलर्ट दिला आहे.

 

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजहवामानतापमान