पुणे : मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीची आणि पेरण्यांची लगबग सुरू केली आहे. दरम्यान, ज्या भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली अशा शेतकऱ्यांनी पेरण्या आणि कापसाच्या लागवडीही केल्या आहेत पण मराठवाडा, विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी पोहोचणार आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात यासंदर्भातील ही माहिती....
(i) मान्सून हर्णाई बारामती पर्यन्त
(ii) मुंबईत अतिवृष्टीची शक्यता
iii) योग्य ओल तेथेच २० जून दरम्यान पेरणीची शक्यता
(iv) १५ जूननंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता '
मान्सून कुठपर्यंत पोहोचला?
मान्सून आज महाराष्ट्रातील हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यन्त पोहोचला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.
मुंबईतील पाऊस कसा असेल?
दक्षिण कोकण किनारपट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे, मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १५ जूनपर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अनुभव मुंबईकरांना ह्या आठवड्यात येऊ शकतो, असे वाटते.
मध्य महाराष्ट्रात पाऊस कसा?
मुंबईतल्या ह्या पावसामुळे नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा उर्जीतावस्थेत येऊन मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो. तेथे म्हणजे ह्या १८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.
मराठवाडा, विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी?
बंगाल मान्सूनी उपसागरीय शाखा एक आठवडा ओलांडला तरी ३१ मे पासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्या शाखेचा मान्सून हिमालयीन पश्चिम बंगालच्या प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचला. त्याच्यापुढे खरं तर मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. परंतु त्या पद्धतीने कोसळतांना जाणवत नाही. त्यामुळे त्या शाखेची मान्सूनची प्रगती होताना दिसत नाही. आणि त्याचा परिणाम विदर्भ मराठवाड्यातील मान्सून च्या प्रगतीवर होतांना दिसत आहे. म्हणून तर विदर्भ मराठवाड्यात सध्या फक्त तूरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते. मान्सूनच्या चांगल्या हजेरीनंतरच तेथील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा असे वाटते.
महाराष्ट्रात खरीप पेरणीची स्थिती काय असू शकते?
महाराष्ट्रात १५ जूनपर्यन्त जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जेथे १० से.मी. चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप ३० ते ४० दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी, २० जून दरम्यान पेरणी होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस २० जून दरम्यान करावे. कारण १५ जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे.
सध्या मान्सूनसाठी वातावरणीय आशादायक चित्र काय आहे?
(i) जमिनीपासून ३ ते ६.५ किमी. उंच अश्या साडेतीन किलोमीटर क्षेत्र हवेच्या जाडीत पूर्वेकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खाली पश्चिमेकडून -पूर्वेकडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा उंचावरील असलेला 'शिअर झोन' हा सध्या १६ डिग्री अक्षवृत्त समांतर म्हणजे मान्सून पोहोचलेल्या सीमा रेषेच्या थोडा उत्तरेकडे आहे. शिवाय
(ii) दुसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते केरळ पश्चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दिड किलोमीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी 'V' अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला 'ऑफ-शोर-ट्रफ' म्हणतात. त्याचे अस्तित्व जाणवत आहे. खरं तर हवामान शास्त्राप्रमाणे त्याला लगेचच 'ऑफ-शोर-ट्रफ' म्हणणे चुकीचे ठरेल कारण अजून मान्सून पूर्णपणे पोहोचला नाही. तरी देखील त्याच्या सदृश्य स्थिती आहे. अश्या दोन मुख्य व लाभदायी प्रणालीमुळे मान्सून मध्ये ऊर्जा भरली जाऊन सध्या पावसाची शक्यता जाणवते.
(सध्या मान्सूनसाठी वातावरणीय आशादायक चित्र काय आहे? ही माहिती संकल्पना स्पष्टता व प्रबोधनासाठीच दिली, असे समजावे, ही विनंती)
- माणिकराव खुळे (Meteorologist (Retd.) IMD Pune