Monsson Rain : राज्यभरामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले असून महत्त्वाच्या धरणांनीही शंभरी ओलांडली आहे. मागील साधारण दोन आठवड्यापासून पावसात खंड पडला होता. पण दोन दिवसांपासून राज्यभरामध्ये पाऊस सुरू झाला आहे. सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वेध लागले आहेत.
येणाऱ्या सात ते आठ दिवस महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. सध्या मध्य भारतात पाऊस सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवस परतीच्या पावसाची शक्यता नाही. तर उत्तर भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरूवात होते. म्हणून येणाऱ्या सात ते आठ दिवस तरी महाराष्ट्रात परतीचा पाऊस येणार नाही.
दरम्यान, नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची रेषा ही अनुपगड, बिकानेर, जोधपूर, भुज, द्वारका मधून जाते. मध्य बंगालच्या उपसागरावर, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि आसपासच्या परिसरात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राजस्थान अन् कच्छमध्ये परतीचा पाऊसआजपासून राजस्थान आणि कच्छच्या काही भागांमधून मान्सूनचा पाऊस परतला आहे. येथे १७ सप्टेंबर रोजी परतीचा पाऊस अपेक्षित होता पण हा पाऊस पाच ते सहा दिवस लांबला आहे. पुढील २४ तासांत मान्सूनचा पाऊस राजस्थानच्या आणखी काही भागांतून आणि पंजाब, हरियाणा,आणि गुजरात लगतच्या काही भागांतून परतीचा प्रवास करण्याची शक्यता आहे.
(maharashtra Rain Latest Updates)