कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरातील काही ठिकाणी आज अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने सकाळी वर्तविलेल्या अंदाजात म्हटले आहे. गोव्यासह शेजारच्या गुजरातलाही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच दिनांक २६ ते २९ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई, कोकणासह अनेक ठिकाणी रेड अलर्ट बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल हवामान खात्याने पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट असून, या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. आज सकाळी दिलेल्या अंदाजात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अजूनही तसेच असल्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविली आहे.
विदर्भाचा काही भाग वगळता आज २६ जुलै रोजी मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा काही भाग याठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून २७ जुलै ते ३० जुलैपर्यंत रोजी मुंबईसह, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीने कहर केला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडून निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परिणामी दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात दोन दिवस अशा बरसणार धारा : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, २६ जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर २७ जुलैला पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भातील अमरावती, यवमतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.