भारतात ३१ मे रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे केरळ किनारपट्टीवर आगमन होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा ४ दिवस लवकर मान्सून दाखल होणार असून उष्ण आणि शुष्क हवामानापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नैऋत्य केरळ किनारपट्टीवर प्रथम मान्सून धडकणर असून गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ला निनाच्या सक्रीयतेमुळे यावर्षी भारतात सरासरीहून अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
प्रचंड उकाडा, वाढते तापमान, उष्ण, शुष्क हवामानाने यंदा भारतातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाने नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरवर्षी १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून जुलैच्या मध्यापर्यंत संपूर्ण देशात पसरतो आणि शेतकरी तांदूळ, मका, कापूस, सोयाबीन पिकांची लागवड सुरु करतात.
भारतातील जवळपास निम्म्याहून अधिक शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतींना पाणी देण्यासाठी, जलाशय आणि जलचरांचे पुनर्भरण तसेच खरिपाच्या पेरण्याही जून ते सप्टेंबरच्या पावसावर अवलंबून आहेत.