नवी दिल्ली: अवघा देश वर्षभर ज्याची चातकासारखी वाट पाहतात, तो मान्सून पुढच्या पाच दिवसांत केरळमध्ये पोहोचणार आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण असून यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (१०६%) पडण्याचा अंदाज भारतीयहवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी वर्तविला.
यावर्षी ईशान्य भारतात सामान्य पातळीपेक्षा कमी, वायव्य भारतात सामान्य तसेच देशाच्या मध्य व दक्षिण प्रदेशात सामान्य पातळीपेक्षा अधिक पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
देशात मान्सूनच्या महत्त्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. तिथे पावसावर अवलंबून असलेल्या कृषिक्षेत्रामध्ये सामान्य पातळीपेक्षा जास्त (सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक) पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
येत्या जून महिन्यात देशात सामान्य पातळीचा पाऊस (दीर्घ कालावधीच्या १६६.९ च्या मिमी सरासरीच्या ९२ ते १०८ टक्के पाऊस) बरसण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
ला निनामुळे जोरदार पावसाची अपेक्षा प्रशांत महासागरात ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना सक्रीय होऊ शकते. त्यामुळे या कालावधीत देशात जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा मोहपात्रा यांनी व्यक्त केली आहे.
कमी दिवसांत अधिक पाऊस■ हवामानातील बदलांमुळे पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे, तर मुसळधार पावसाच्या घटना (थोड्या कालावधीत जास्त पाऊस) वाढत आहेत. त्यामुळे दुष्काळाची शक्यता असते.■ गत आठवड्यात भारतातील १५० प्रमुख जलाशयांतील जलसाठा कमी झाला. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई वाढल्याचे केंद्रीय जलआयोगाने म्हटले आहे.
अधिक वाचा: Rain Forecast यंदा कोणत्या नक्षत्राचं वाहन देणार जास्त पाऊस; कधी पडणार पाऊस?