नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मान्सून १९ ते २५ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीयहवामान खात्याने गुरुवारी वर्तविला.
दरवर्षी केरळमध्ये सर्वसाधारणपणे १ जूनला मान्सूनचे आगमन होते व ८ जुलैपर्यंत तो सारा देश व्यापतो. त्यानंतर १७ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सरू होऊन तो १५ ऑक्टोबरला पूर्ण होतो.
भारतीयहवामान खात्याने सांगितले की, यंदाची स्थिती लक्षात घेता मान्सून १९ ते २५ सप्टेंबर या दरम्यान परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता आहे.
१ जूनपासून देशात ८३६.७ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण सरासरी ७७२.५ मिमी पर्जन्यमानापेक्षा ९ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा वायव्य, मध्य, दक्षिण भारतात अनुक्रमे चार टक्के, १९ टक्के, २५ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.