यंदा देशात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण करत मान्सूनने आजपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. देशात दरवर्षी सरासरी १७ सप्टेंबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. मात्र, यंदा त्यास आठ दिवसांचा उशीर झाला. मान्सूनने आज राजस्थानच्या नैऋत्य भागातून काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.
वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास हा भारतीय उपखंडातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे प्रतीक आहे. परतीच्या प्रवासाला विलंब झाल्यास देशात अधिक दिवस पावसाचे राहतात. सलग १३ वर्षे मान्सून उशिरा परतीचा प्रवास सुरू करत आहे. त्याचा थेट कृषीक्षेत्रावर होतो. खरिपातील पीक कापणीवेळी पाऊस आल्यास शेतीमालाचे मोठे नुकसान होण्याचीही भीती असते.
कसा असतो मान्सूनचा प्रवास?
केरळमध्ये दरवर्षी मान्सून सरासरी १ जूनला दाखल होतो आणि ८ जुलैपर्यंत देशभरात पोहोचतो. त्यानंतर १७ सप्टेंबरला वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करून १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून बाहेर पडतो.
महाराष्ट्रातून कधी परतणार
दरम्यान महाराष्ट्रातून गुरुवार दि.५ ऑक्टोबरला मान्सून माघारी फिरू शकतो असे भाकीत हवामान विभागाचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविले आहे.
असा आहे पावसाचा अंदाज
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण छत्तीसगडमधील बस्तर, दांतेवाडापासून महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी राजापूर पर्यन्तची साडेचार किमी उंचीवर असलेल्या १२०० मीटरच्या हवेच्या कमी दाबाच्या घळीमुळे पुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार दि.२८ सप्टेंबरपर्यंत विदर्भ वगळता मुंबईसह संपूर्ण २५ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र पुढील ४ दिवस केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.