Todays Weather Updates : मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे पहाटेचे तापमान किमान सरासरी तापमानापेक्षा २ डिग्री से.ग्रेडने खालावून ११ ते १४ (कोल्हापूर १७, मुंबई १९) डिग्री से.ग्रेडदरम्यान टिकून असल्यामुळे ह्या एकूण १५ जिल्ह्यात पहाटेचा गारवा चांगलाच जाणवत आहे.
परंतु संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीपेक्षा खाली तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा १ ते २ डिग्री से.ग्रेडने वाढ होवून भाग बदलत २९ ते ३७ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे. त्यामुळे दुपारनंतर चांगलाच ऊबदारपणा जाणवण्यास सुरवात झाली आहे.
जम्मू काश्मीन, लेह-लडाख, हमाचल प्रदेश, उत्तराखंड अश्या ३ राज्यात, एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, (रविवार व मंगळवार) दि.१० व १२ मार्च रोजी रात्री प्रवेशतील. त्यामुळे १० ते १४ मार्च असे ५ दिवस तेथे वारा वीजा, गडगडाटीसह पाऊस, बर्फबारी व थंडी जाणवेल. परिणामी आपल्याकडे महाराष्ट्रातही त्या ५ दिवसात वातावरण कोरडे राहून केवळ पहाटेची थंडीच फक्त जाणवणारच आहे. पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता महाराष्ट्रात नाही.
३- सध्याच्या २०२३-२४ च्या एल-निनो वर्षातील रब्बी पिकांना, फेब्रुवारी १४ ते १४ मार्च २०२४ अश्या एक महिन्याच्या वाढीव दिवसात भले कमी तीव्रतेची का असेना पण जी थंडी उपभोगण्यास मिळत आहे, ती गेल्या २०२०-२२ अश्या ला-निनाच्या तीन वर्षातही महाराष्ट्रातील रब्बी हंगामांना मिळाली नाही.
चालु एल- निनो वर्षातही, उत्तर भारतातील अधिक वारंवारतेच्या पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून महाराष्ट्रात मिळालेल्या थंडीच्या जोरावरच आपण रब्बी हंगाम जिंकत आहोत, हे मुद्दाम पुन्हा पुन्हा नमूद करावेसे वाटते. अन्यथा खरीपसारखी रब्बीची अवस्था झाली असती.
कोरोनात अर्थव्यवस्थेसाठी तर एल-निनोत शेतीत महाराष्ट्राबरोबर देशातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करून संधीचे सोने केले. शेतकऱ्याबद्दल ह्याची नोंदही देशवासियांच्याही मनी असावी, एव्हढीच माफक अपेक्षा !
- माणिकराव खुळे, Meteorologist (Retd) IMD Pune.