नैऋत्य मोसमी पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर राज्यात ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. राज्यभरात तापमानात वाढ होताना दिसत असून येत्या काही दिवसात उन्हाचा पारा वाढणार आहे.
आज राज्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून कमाल तापमानाचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. नागपूरात आज ४१.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात उर्वरित जिल्ह्यांमध्येही तापमान ३० अंश सेल्सियसच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे. भंडारा, धूळे,जळगाव, नाशिक, पुणे, धाराशिव, बुलढाणा जिल्हयांत तापमान ३५ अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याचे चित्र होते. दरम्यान, राज्यात विदर्भ, मध्ये महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार असून दिनांक ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सापेक्ष आर्द्रता ४५ ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ११ ते १७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.