नागपूर :
गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला नागपूरकरांवर आकाशातून पाऊस आपत्तीसारखा कोसळला. 30 हजारांहून अधिक घरांत पाणी शिरले, हजारो दुकानांतील मालाची नासधूस झाली. चौघांना आपला जीव गमवावा लागला.
त्यामुळे यंदाही सप्टेंबरमध्ये नागपूरकरांना अशा स्थितीचा सामना करावा लागतो की काय, अशी भीती होती. मात्र, यावर्षी पावसाचे रौद्र रूप दिसले नाही. पावसाने तारले तरी उकाड्याने मात्र नागपूरकरांना प्रचंड छळले.
महिनाभराचा आलेख पाहता ३० दिवसांत केवळ १०-१२ दिवस पावसाच्या सरी आल्या, त्यातील पाच दिवस चांगली हजेरी लावली. केवळ तीन-चार दिवस दिलासादायक गारवा नागपूरकरांनी अनुभवला. त्याऐवजी जवळजवळ २० दिवस उकाड्याचाच सामना करावा लागला. त्यामुळे कूलर, पंखे बंद ठेवण्याची संधीही नागरिकांना मिळाली नाही.
असा आहे महिन्याचा आलेख
■ ३० ऑगस्टच्या रात्री पाऊस झाला. वेधशाळेने १ सप्टेंबरला रेड अलर्ट दिला होता. मात्र, पावसाऐवजी तापमान वाढले. तापमान ३३.७ अंशांवर गेले होते.
■ ४ सप्टेंबरला पावसाच्या सरी आल्या, पण त्या नगण्य होत्या.
■ ७ व ८ सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवशी पावसाने दिलासादायक हजेरी लावली व उकाडा काहीसा कमी झाला. त्यानंतर ढग शांत झाले.
■ १० सप्टेंबरला पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. तापमान पहिल्यांदा २७ अंशांवर घसरले.
■ ११ सप्टेंबरला ढग शांत होते, १२ सप्टेंबरला हलक्या सरी बरसल्या.
■ पुढे १३ ते १९ सप्टेंबरपर्यंत पावसाने दडी मारली. मध्य पावसाची सर आली, पण प्रमाण नगण्य होते.
■ १५ सप्टेंबरला तापमान ३३.२ अंश होते, जे विदर्भात सर्वात हॉट होते. त्यानंतर तापमान तब्बल ३५ अंशांच्याही वर गेले.
■ २१ व २२ सप्टेंबरला पावसाने चांगली हजेरी लावली.
■ २३ सप्टेंबरला ढग शांत होते, पण तापमान ३४ अंशांवर होते.
■ २४ तारखेला पावसाने जोरदार पुनरागमन केले. या पावसाचा जोर २६ पर्यंत होता.
■ २५ सप्टेंबरला पहिल्यांदा तापमान २६ अंशांच्या खाली गेले होते.