Join us

Nagpur Weather News : वेधशाळेचा अंदाज खरा ठरला ; विदर्भात बहुतेक जिल्ह्यांत सरी बरसल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:49 AM

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Nagpur Weather News)

Nagpur Weather News :

नागपूर : 

हवामान विभागाच्या अंदाजाला पहिल्या दिवशी हुलकावणी देणारा पाऊस दुसऱ्या दिवशी मात्र बरसला. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारीही कायम होता. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान पावसामुळे मोठ्या फरकाने खाली घसरले उकाड्यापासून दिलासा मिळाला. 

हवामान विभागाने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र व इतर वातावरणीय परिस्थितीमळे मध्य भारतासह इतरही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. असा अंदाज असतानाही २३ सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाचा थेंबही बरसला नाही.

उलट वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मध्यरात्री मात्र वातावरण बदलले आणि पावसाला सुरुवात झाली. २४ (मंगळवार) रोजीच्या सकाळी आकाश काळ्याभोर ढगांनी वेढले होते. पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता.

नागपुरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत २४ तासात २३ मि.मी. पावसाची नोंद झाली. भंडाऱ्यात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरला सकाळपर्यंत बरसलेला पाऊस नंतर शांत होता.

२४ ते २६ सप्टेंबर या काळात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये आज  (२५ सप्टेंबर) रोजी अतिजोरदार पावसाची शक्यताही वेधशाळेने वर्तविली आहे.

हा परतीचा पाऊस नाही

दरम्यान २३ सप्टेंबरपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून २४ सप्टेंबर रोजी राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणाच्या काही भागातून काढता पाय घेतला. मान्सून परतीची लाइन फिरोजपूर, सिरसा, माउंट अबू, चुरू, अजमेर, दीसा, सुरेंद्रनगर, जुनागड या भागातून गेली व ती हळूहळू पुढे सरकत आहे. 

विदर्भ व मध्य भारतात सध्या सुरू असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विदर्भातून ५ ते १० सप्टेंबरदरम्यान मान्सून निघण्याची व या काळात मध्यम पाऊस होण्याचीही शक्यता आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून देशातून निघून जाईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसनागपूरविदर्भ