Nagpur Weather Report :
नागपूर : रात्रीच्या तापमानात सातत्याने होत असलेली घसरण गुरुवारीही (१४ नोव्हेंबर) रोजी कायम होती. बुधवारी (१३ नोव्हेंबर) रोजी १६ अंशांवर असलेले नागपूर शहराचे किमान तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने घसरत १५ अंशांवर पोहोचले, जे विदर्भात सर्वांत कमी होते.
पारा घसरल्याने रात्रीच्या वेळी गारठ्याची जाणीव अधिक तीव्रपणे व्हायला लागली आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातील वातावरण बदलायला लागले आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत धुक्याची चादर पसरत आहे. त्या प्रभावाने मध्य भारतातही वातावरणात गारवा तयार झाला आहे.
विदर्भात सायंकाळपासून ही परिस्थिती बघायला मिळते. नागपूरशिवाय भंडारा १५.१ अंश, गडचिरोली १५.४, यवतमाळ १५.५ व चंद्रपूरला किमान तापमान १५.६ अंशांवर आले आहे. वर्धा, अमरावती १६ अंशांवर, तर अकोला १८ अंशांवर आहे.
दिवसाचा पारा अद्यापही सरासरीच्या आसपास आहे. अकोला व अमरावतीत दिवसा हवामान तापत आहे. येथे कमाल तापमान १.२ व २.५ अंशांनी अधिक आहे. विदर्भात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस कमाल व किमान तापमान स्थिर राहणार आहे. विधानसभेच्या मतदानानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
असे आहे किमान तापमान
शहर | तापमान (अंश सेल्सिअस) |
भंडारा | १५.१ |
गडचिरोली | १५.४ |
यवतमाळ | १५.५ |
चंद्रपूर | १५.६ |
अमरावती | १६ |
अकोला | १८ |