Nalganga Dam :
बुलढाणा : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अजिंठा पर्वतरांगांमधील झरे, ओढे आणि छोट्या नद्या प्रवाहित झाल्यामुळे तुटीच्या खोऱ्यात येत असलेले नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
त्यातच पाऊस थांबला असला तरी डोंगर दऱ्यांतून नळगंगा नदीद्वारे प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पाहता गेल्या १५ ते २० दिवसांत दोन वेळा प्रकल्पाचे तीन गेट ३ इंचांनी उघडावे लागले आहेत. त्यामुळे यंदा नळगंगा धरणाखालीलशेतीसाठी पूर्णक्षमतेने सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे.
नळगंगा धरण हे १९६० च्या दरम्यान बांधण्यात आले आहे. त्यावेळचे जिल्ह्यातील माती बांधकाम असलेले सर्वांत मोठे धरण होते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने या धरणाचे एक महत्त्व होते.
मोताळा, नांदुरा, मलकापूर तालुक्याच्या शेती सिंचनासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. जवळपास ७० दलघमी साठवण क्षमता या प्रकल्पाची आहे.या प्रकल्पावर १०३ किमी लांबीचे कालवे असून त्याद्वारे टेल टू हेड या पद्धतीने रब्बी हंगामात पाणी दिल्या जाते.
परंतु मधल्या काळात जिल्ह्यात एक प्रकारे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे प्रदीर्घ काळ हे धरण भरत नव्हते. त्यामुळे सिंचनाचाही प्रश्न निर्माण होत होता. त्यातच जवळपास ८ दलघमी नळगंगा प्रकल्पाची तूट नोंदविल्या गेली होती. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हा प्रकल्पही मंजूर झालेला आहे. यंदा मात्र वरुण राजाने कृपा केल्याने नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. प्रकल्पातून पाण्याचाही विसर्ग केला गेला होता. आता तर पावसाळा संपला असला तरी अजिंठा पर्वतरांगेतून वाहणारे ओढे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत.
त्यामुळे प्रकल्पामध्ये येव्याचे प्रमाण अद्यापही अधिक आहे. त्यामुळेच प्रकल्पातून मधल्या काळात दोन वेळात पाण्याचा विसर्ग करावा लागला होता.
तीन तालुक्यांना होईल लाभ
■ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे आता मलकापूर, नांदुरा आणि मोताळा तालुक्यातील शेतीची सिंचनाची सोय झाली आहे.
■ परंतु त्यासाठी या प्रकल्पावरील १०३ किमी लांबीच्या कालव्यांची दुरुस्ती करून टेल टू हेड याप्रमाणे पाणीपुरवठा कसा होईल, यासाठी आता सिंचन शाखेला काम करावे लागणार आहे.त्यासाठीही निधीची तरतूद करावी लागेल. वर्षानुवर्षे या कालव्यांची दुरुस्ती झालेली नाही.