गेल्या काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने वातावरणातील बदलामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असून, रविवारी मागील चोवीस तासांत नांदेड जिल्ह्यात या वर्षातील सर्वाधिक ४२.४ सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात सूर्य आणखी कोपण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन ते तीन वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कधी आभाळमय वातावरण तर कधी कडक ऊन यामुळे नांदेडकर घामाने बेजार होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंशावर असताना रविवारी अचानक नांदेडचे तापमान ४२.४ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आल्याने रविवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. गतवर्षी नांदेड जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान झाले होते. यंदा सुरूवातीला ढगाळ वातावरण अन् अधूनमधून अवकाळी पाऊस यामुळे तापमानाचा पारा घसरला होता. पण, गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकू लागल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस चांगला पडतो. त्या प्रमाणात उन्हाचे चटकेही सोसावे लागतात.
उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्याने वातावरणात उष्णता निर्माण होते. उन्हामुळे अनेकांना उष्माघाताला सामोरे जावे लागते. त्यासाठी नागरिकांनी तापमानापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना प्रत्येकाने आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. उन्हामध्ये शेतीची कामे करणाऱ्या व्यक्ती, हृदयविकार, मूत्रपिंड, यकृत आणि त्वचाविकार तसेच रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती, धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना उष्माघाताचा जास्त धोका संभवतो. त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे, भरदुपारी उन्हात कामे करण्याचे टाळणे गरजेचे आहे.
दुपारी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर निघताना स्वतःचा उन्हापासून कसा बचाव होईल, यासाठी काळजी घ्यावी. दिवसभराची कामे शक्यतोवर सकाळी व सायंकाळी करावीत. पांढरे आणि हलके सुती कपडे वापरावे.
वाढत्या उन्हामुळे आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारले असून, येथे स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.