नाशिक : नाशिक शहर व (Nashik) परिसरात मागील काही दिवसांपासून वातावरणात काहीसा गारठा जाणवत होता; मात्र शनिवारी अचानकपणे किमान तापमानाचा (temprature) पारा थेट 12.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तर आज रविवारी काहीसा बदल होत तापमानाचा पारा 12.6 अंशावर गेला. त्यामुळे आता हळूहळू थंडीची सुरवात झाली असून नाशिककरांना आता गुलाबी थंडी (Winter) अनुभवयास मिळत आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली होती. नाशिककरांना पहाटे हुडहुडी भरली. संध्याकाळी हवेत गारवा जाणवला. यामुळे नागरिकांनी शनिवारी उबदार कपडे वापरण्यावर भर दिल्याचे दिसून आले. हंगामात प्रथमच ही नीचांकी नोंद झाली. अवकाळी पावसानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, लहरी निसर्गाने ती शक्यता फोल ठरविली. दोन दिवस वातावरणात गारठा वाढला. त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले होते. मागील आठवड्यापासून आकाश निरभ्र राहत असून हवामान कोरडे झाले आहे. यामुळे गुलाबी थंडी परतत असल्याचे नागरिकांना जाणवण्यास सुरुवात झाली.
गेल्या रविवारी सकाळी 15.3 अंशांपर्यंत किमान तापमान घसरले होते. 14 ते 15 अंशाच्या जवळपास स्थिरावणारा पारा शनिवारी थेट 12 अंशापर्यंत खाली आला. तर आज कालच्या पेक्षा थोडा बदल होऊन पारा 12.6 अंशावर गेला. यामुळे थंडीचा कडाका शहरात चांगलाच वाढला होता, तसेच कमाल तापमानसुद्धा 30 ते 28 अंशाच्यामध्ये स्थिरावत होते; मात्र शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कमाल तापमानदेखील घसरले 27.2 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान शहरात नोंदविले गेले. यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच वातावरणात गारवा वाढला होता, आतापर्यंत निफाडमध्ये पारा 12 अंशाच्या जवळपास स्थिरावत होता शहरात शनिवारी पारा घसरल्याने ही हंगामातील पहिली नीचांकी नोंद झाली. निफाडमध्ये शनिवारी 12.4 अंश सेल्सिअसइतके तापमान नोंदविले गेले.
थंडीवर 'अल-निनो'चा प्रभाव
यावर्षी थंडीवरसुद्धा अल-निनोचा प्रभाव पाहावयास मिळत आहे. सरासरी किमान तापमान हे दरवर्षीच्या तुलनेत किमान 2 ते 3 अंशानी जास्त असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. डिसेंबरमध्ये नाशिक शहरात किमान तापमान 19 ते 13 अंशापर्यंत खाली घसरते. मात्र, यावर्षी पारा हा 15 अंशाच्या जवळपास स्थिरावत आहे. वातावरणात पुढील दोन ते तीन दिवस गारठा जाणवेल. मात्र, थंडीचा कडाका फारसा राहणार नाही, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.