Join us

पुढील तीन दिवसांत 'या' जिल्ह्यांत अवकाळीची शक्यता! गुढीपाडव्याला कसे असेल हवामान?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 6:49 PM

शेतकऱ्यांनी न घाबरता सावधानतेने पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावे.

राज्यातील पुढील चार दिवसांत हवामानात बदल होणार असून शनिवार (दि. ६ एप्रिल) ते मंगळवार (दि. ९ एप्रिल) म्हणजे गुढीपाडवा पर्यंतच्या ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता आहे.

त्यातही विशेषतः गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ८ एप्रिलला विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात ह्या अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष न घाबरता सावधानतेने पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावे, असे वाटते.            उष्णतेची स्थिती -  सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ डिग्री से. ग्रेड च्या श्रेणीत जाणवत असून साधारणपणे ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक आहे.  विदर्भात हीच उष्णता, ९८ व्या टक्केवारीत म्हणजे विदर्भाच्या ९८ व्या टक्केवारीपेक्षा अधिक परीक्षेत्रात भाग बदलत दुपारचे कमाल तापमान हे निम्न पातळीतील ४० डिग्री से. ग्रेड असून उर्वरित २ % पेक्षा कमी परिक्षेत्रात भाग बदलत निम्न पातळीतील ४० डिग्री से. ग्रेड कमाल तापमानपेक्षा अधिक म्हणजे ४१, ४२ डिग्री से. ग्रेड जाणवेल. 

मुंबईसह कोकणात मात्र साधारणपणे दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३२ ते ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास तर पहाटेचे किमान तापमानही सरासरीइतके म्हणजे २२ ते २४ डिग्री से. ग्रेडच्या आसपास असण्याची शक्यता जाणवते. उष्णतेची ही सर्व स्थिती महाराष्ट्रात आजपासून ३ दिवस म्हणजे ६ एप्रिल पर्यंत जाणवेल.                               उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा - विदर्भात काही ठिकाणी उद्या व परवा (५ व ६ एप्रिल शुक्रवारी व शनिवारी) दोन दिवस भाग बदलत दिवसा उष्णतेच्या लाटेची तर रात्री उकाड्याची स्थिती जाणवू शकते. 

किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता - मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात उद्यापासून तीन दिवस म्हणजे (५ ते  ७ एप्रिलला, शुक्रवार ते रविवारपर्यंत) तीन दिवस दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.                कश्यामुळे आहे हे अवकाळीचे वातावरण ?मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्हा परिसर ते कर्नाटक ओलांडून दक्षिण तामिळनाडूतील मदुराई जिल्हा परिसरा पर्यंतच्या समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत व काही किलोमीटर रुंदीत असलेले हवेच्या कमी दाबाचा आसाचे म्हणजेच वारा खंडितता प्रणालीत पसरलेल्या क्षेत्रात दोन्हीही, अरबी व बंगालच्या उपसागरातून उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय आर्द्रतायुक्त पण विरुध्द दिशेने ताशी २० ते २५ किमी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संगमातून सध्याच्या अवकाळीचे वातावरण तयार झाले आहे. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊस