संपूर्ण महाराष्ट्रात गारठा वाढला असून नाशिक जिल्ह्यातील थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये देखील हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक निचांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर शनिवारी 11.2 अंश इतके नोंदविले गेले. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. यावर्षीचे हे सर्वात नीचांकी तापमान असल्याचे सांगण्यात आले आहे.
कॅलिफोनिया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडी अनुभवयास मिळते. सद्यस्थितीत थंडीत वाढ होण्यास सुरवात झाली असून शेवटी शेवटी हे तापमान साधारण 2 अंशावर येऊन ठेपते, तेव्हा हाडं गोठवणारी थंडी परिसरात जाणवते. यंदा देखील थंडीला सुरवात झाल्यानंतर हळूहळू तापमान घसरण्यास सुरवात झाली आहे. आज पहाटे यंदाच्या हंगामातील निफाड कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. 11.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत आहे, मध्यतंरी ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. मात्र ढगाळ वातावरण गेल्यानंतर पुन्हा थंडीने जोर धरला आहे.
निचांकी तापमानाची नोंद
दरम्यान नाशिकमध्ये आजचं तापमान हे घसरलं आहे. कारण काल शहरात 16.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज थेट तीन अंशांची घट होऊन 13.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यानंतर निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर तापमान नोंदवले जाते. या ठिकाणी देखील काल 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र आज यातही 2 अंशांची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज रोजी कुंदेवाडी हवामान केंद्रात 11.2 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला.
द्राक्ष पिकांना धोका
दरम्यान निफाड परिसरातील ही थंडी गहू ,कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष पिकावर होऊ लागला आहे. तालुक्यात सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मात्र थंडी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. मन्यांना तडे जाणे, फुगवण थांबणे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणे, पाने पिवळी पडणे, वेलेची वाढ थांबणे, परिपक्व घडातील शूगर कमी होणे असे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. वार्षिक एकदाच उत्पन्न देणारे पीक असल्याने मोठा खर्च झाला आहे.