Join us

Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:55 AM

भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे.

भोर : भोर तालुक्यात निरादेवघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली सोडल्याने धरणात सध्या ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ४ पट पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी वाढली आहे.

भोर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले निरादेवघर धरण १२ टीएससीचे आहे. यावेळी धरण १०० टक्के भरले होते. मागील वर्षी धरणात ३५ टक्के पाणीसाठा होता. यावेळी फक्त ८ टक्के पाणीसाठा तर भाटघर धरणात सध्या १० टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २० टक्के साठा होता.

वीर धरणात सध्या २१ टक्के तर मागील वेळी ४२ टक्के साठा होता. गुंजवणी धरणात २१ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ३५ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत धरणात तीन ते चारपट पाणीसाठा कमी आहे.

मात्र पूर्व भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या कामासाठी धरणातील पाणी मागील चार-पाच महिन्यापासून सोडले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धरणात कमी पाणीसाठा आहे. सध्या धरणात ८ टक्के पाणीसाठा राहिल्याने धरणातील पाणी सोडणेबंद केले आहे.

मात्र धरणात अत्यंत कमी पाणीसाठा राहिल्याने धरणात असलेल्या पाणीपुरवठा विहिरी कोरड्या पडल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या वारखंड, कारुंगण, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, कुडलीबु, कुडलीखु, गुढे, निवंगण, पहरखु, हिरडोशी कोंढरी, वेनुपुरी या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.

भोर पंचायत समितीकडून १३ गावात ८ टँकरने निरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील प-हरबुदुकची कचरेवस्ती, उंब्राटकरवस्ती, भोरमहाड रस्त्यावरील शिळींब, उंबार्डे, वारखंड, नानावळे शिंदेवस्ती राजीवडी येथे दररोज एक खेप याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे तर महामार्गावरील ससेवाडी (२), शिंदेवाडी (४), करंदीखेबा (३) पाचलिगे एक याप्रमाणे तर वीसगावमधील वरोडीखुर्द वरोडी डायमुख वेळवंड भागातील जयतपाड हुंबेवस्ती येथे टँकर मंजूर आहेत.

अधिक वाचा: Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईपाणीकपातभोर