अशोक डोंबाळे
केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकसरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण जल आयोग आणि पाणी लवादाने दिले आहे.
सांगलीतील वकील विश्राम कदम यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावर आयोगाने लेखी उत्तर देत कर्नाटकसरकारलाही विनापरवाना उंची वाढविता येणार येणार नाही, अशी सक्त सूचना दिली आहे.
अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले आहे. धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात असून, पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. अलमट्टी धरणाचे बांधकाम २००५ मध्ये पूर्ण झाले आहे. धरण पूर्ण झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण झाल्याचा काही अभ्यासकांचा आरोप आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून चर्चेत आहे. धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे ॲड. विश्राम कदम यांनी पंतप्रधान कार्यालय भारत सरकार यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती.
यावर केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय पाणी लवाद यांनी ॲड. विश्राम कदम यांना दि. १ मार्च २०२५ रोजी लेखी उत्तर दिले आहे. यामध्ये अपर कृष्णा प्रकल्प टप्पा ३.
कर्नाटक यांच्याकडून प्रकल्प अहवाल मार्च २०२१ मध्ये केंद्रीय जल आयोगाकडे मूल्यमापनासाठी मिळाल होता. या प्रकल्पामध्ये अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवून अतिरिक्व पाण्याचा वापर करण्याचा प्रस्ता होता.
या पाणी वापराचा प्रस्ताव कर्नाटक जलविवाद न्यायाधिकरण २ यांच्याकडून मिळाला होता, त्यास अद्याप मंजुरी दिली नाही. तो प्रस्ताव फेब्रुवारी २०२२ मध्ये कर्नाटक सरकारला परत पाठवला आहे.
त्यामुळे सद्यःस्थितीत अलमट्टी धरणाची उंची तथा पाणी साठवण क्षमता वाढणार नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यास भविष्यात धरणवाढीचा कोणताही धोका राहिलेला नाही, अस लेखी खुलासा केंद्रीय पाणी लवाद यांनी केला आहे.
केंद्राच्या मंजुरीशिवाय उंची वाढणार नाही : विश्राम कदम
• केंद्रीय जलशक्ती मंत्रालय तसेच जनसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाचे संचालक नीरजकुमार शर्मा यांच्याकडून अलमट्टी धरणाबाबत लेखी खुलासा मला मिळाला आहे.
• त्यानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय पाणी लवाद यांच्याकडून परवानगी दिलेली नाही. परस्पर कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार नाही. तसेच पाणीसाठाही करू शकणार नाही, असेही त्यांनी या खुलाशात म्हटले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम कदम यांनी दिली.
असे आहे अलमट्टी धरण
अलमट्टी धरणाचे काम २००५ मध्ये पूर्ण झाले. धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा २०० टीएमसी आणि ५१९ मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा १२३ टीएमसी होतो.