Join us

उत्तरेचे वारे राज्यात धडकले; कशी राहणार थंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 1:22 PM

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे.

पुण्यात कडाक्याच्या थंडीमुळे पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. गारठा वाढल्याने पुण्यातील किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आले आहे. यंदाच्या हंगामातील हे नीचांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. पुण्यात बुधवारी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

आज तर एनडीए, हवेलीमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे या हंगामातील नीचांकी तापमान नोंदवण्यात आले आहे. सध्या उत्तरेकडील किमान तापमान प्रचंड घसरले आहे. थंड हवेचा झोत महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंड वारे अंगाला झोंबत आहे. दिवसभरही थंडी कायम राहत असल्याने पुणेकर स्वेटर घालूनच घराबाहेर पडत आहेत.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठून गेला आहे. परिणामी राज्याच्या किमान तापमानात मोठी घट झालेली आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. तसेच, विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

कोकण वगळता राज्यात गारठाकोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे ८ ते १२ डिग्री सेल्सिअस ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी, तर जळगाव, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर व उत्तर विदर्भ येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने कमी) तर दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने कमी) दरम्यानचे असू शकते, असे वाटते, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईसह कोकणात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से. ग्रेड, तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड (म्हणजे दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी) दरम्यानचे असू शकतात, असे वाटते. महाराष्ट्रसारखीच गुजरातमध्येही चांगलीच थंडी जाणवत असून म्हणून तर मुंबईही गारठली आहे. आकाश निरभ्र राहून थंडी १ फेब्रुवारीपर्यंत अशीच असणार असून एखाद्या डिग्रीने तापमानात वाढ जाणवेल. परंतु, थंडी ही जाणवणारच आहे. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

टॅग्स :हवामानतापमानपुणेमहाराष्ट्रविदर्भ