दोन दिवसांपासून शहरात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी (दि. १६) तर दिवसभर हवेतील गारवा खूपच वाढला. सकाळी पाषाण परिसरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतर ठिकाणीदेखील किमान तापमानात घट दिसून येत आहे. आणखी दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात आणि पुणे शहरात गारठा वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहणार असून, १७ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या किमान तापमानात मोठी घट होत आहे. विदर्भासह मराठवाडा,मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या खाली आला आहे. रविवारी (दि. १७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पहाटेच्या वेळी गारठा वाढलेला जाणवत आहे.दरम्यान, रविवारी (दि. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीआहे.
श्रीलंकेवर चक्रवाताची स्थिती निर्माण झाल्याने ते वारे मध्य महाराष्ट्रात वाहू शकते. त्यामुळे पुढील ७२ तासांत पहाटे धुके पडेल. तसेच किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
शहरात शनिवारी हंगामातील नीचांकी किमान तापमान
पाषाणला १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे पुणेकर गारठून गेले. दोन दिवसांत किमान तापमान आणखी कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.