Join us

जायकवाडी धरणातील जलसाठ्यात दीड टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:30 AM

नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहातून पाणी सोडण्यात आल्याने रविवारी जायकवाडीत १५ हजार ९२५ क्युसेक क्षमतेने आवक झाली. २४ तासांत जलसाठ्यात दीड ...

नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहातून पाणी सोडण्यात आल्याने रविवारी जायकवाडीत १५ हजार ९२५ क्युसेक क्षमतेने आवक झाली. २४ तासांत जलसाठ्यात दीड टक्का वाढ झाली असून, रविवारी सायंकाळी जलसाठा ३३.८७ टक्के झाला.

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधारेमुळे शनिवारी तेथील धरणसमूहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीस पूर आला. पुराचे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. रविवारी जायकवाडी धरणात १५ हजार ९२५ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक झाली.

पावसाचा जोर मंदावल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहातून होणारा विसर्ग कमी केला. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग बंद केला. दारणातून १ हजार १००, तर पालखेड ४३७, आळंदी २१०, कडवा ४२९ क्युसेक असा नाममात्र विसर्ग रविवारी सायंकाळी सुरू होता. यामुळे नांदूरमधमेश्वर धरणातून २५ हजार क्यूसेक गोदावरीत होणारा विसर्ग ४ हजार ११७ क्युसेकपर्यंत कमी केला, असे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

२४ तासांत जलसाठ्यात दीड टक्क्याने वाढ

रविवारी सायंकाळी ६ वाजता जायकवाडी धरणात  धरणाची पाणीपातळी १ हजार ५०७.०६ फूट झाली असून, जलसाठा ३३.८७ टक्के झाला आहे. धरणात १ हजार ४७३.३४४ दलघमी एकूण जलसाठा असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

यंदा पहिल्यांदाच गोदावरी खळाळली

कायगाव : नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने गोदावरी नदी यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून शुक्रवारी सायंकाळी सुमारे २५ हजार क्युसेक पाणी सोडण् आले. रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गोदावरीचे पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर असणाऱ्या जुने कायगावला धडकले. गोदावरीच्या पात्रातून पाणी जुने कायगावला पोहोचले की जायकवाडी धरणात पाण्याच्या आवकाची नोंद सुरु होते.

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणीकपातनाशिकमराठवाडा