परभणी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात केवळ २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, हे पाणी चार महिन्यापर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या ८० गावांमध्ये येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.
मापेगाव बु. गावाजवळ सर्व गावांना पाणीपुरवठा सप्लाय करण्यासाठी वॉटर ग्रीड पॉइंट आहे. या वॉटर ग्रीड पॉइंटवरून सध्या तरी रोज पाणी सोडवण्यात येत आहे. निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा हा केवळ २२ टक्केच आहे. सध्या पाणी असून हे पाणी तीन ते चार महिनेच पुरणार आहे. त्यानंतर तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. सध्या ८० गावांना दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. जर या पाण्याचे नियोजन केले तर हे पाणी पाच ते सहा महिने पुरू शकते, असे सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले.
मापेगाव बु. पुनर्वसित गावाजवळील वॉटर ग्रीडवरन्न सध्या तरी सर्व गावात रोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणातील पाणीपातळी पाहून चित्र भीषण दिसत आहे - अमोल कायंदे, फिल्टर सुपरवायझर, मापेगाव बु.
निम्न दुधना प्रकल्पात २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यापुढे पाण्याचे नियोजन करूनच पाणीपुरवठा करावा, नसता भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.-बालासाहेब मर्गे, शाखा अभियंता, निम्न दुधना प्रकल्प
मागील वर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र, यांदा कमी झालेल्या पावसाने धरणसाठ्यात कमालीची घट झाली आहे. सध्या रब्बी पेरण्यांच्या तोंडावर शेतीसाठी आणि वापरासाठी परभणी जिल्ह्यातील साधारण ८० गावांची तहान निम्न दुधना प्रकल्प भागवते. केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. योग्य पाणी नियोजन केले तरच हे पाणी पुरेल, अन्यथा पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण होण्याची शक्यता आहे.