Join us

लातूरच्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:17 PM

एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी असल्याचे दिसन येत आहे.

तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने जिवाची काहिली होती आहे. वाढत्या उन्हामुळे जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत, तर जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील आठपैकी पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७.२२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. दरम्यान, अवैधरीत्या पाणी उपसा रोखण्यासाठी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे.

पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. काही गावांनी तर हिवाळ्याच्या अखेरीसच अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले. तनंतर उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यापासून तर रविराजा रौद्ररुप धारण करू लागल्याने दुपारच्या वेळी जिवाची काहिली होत आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये उष्णता अधिक वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी असल्याचे दिसन येत आहे.

प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा सध्या जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपयुक्त साठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात १.३८०, देवर्जनमध्ये ०.९०९, साकोळमध्ये १.५००, घरणीत २.११७, तर मसलगा मध्यम प्रकल्पात २.९१७ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. एकूण ८.८२३ दलघमी पाणी शिल्लक आहे.

दहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा...

जिल्ह्यातील २३ गावे आणि ३ वाड्या अशा एकूण २६ गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यापैकी १० गावांना १० टैंकर मंजूर करण्यात येऊन ते सुरू करण्यात आले आहेत.

१६८ गावांना अधिग्रहणाचे पाणी...

सध्या जिल्ह्यातील ३०१ गावे आणि ५१ वाड्या अशा एकूण ३५२ गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४८३ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :धरणपाणीपाणीकपातलातूर