Join us

बंधाऱ्यांमध्ये उरला निम्माच साठा; नांदेड, परभणी, हिंगोलीत उभे ठाकणार जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 1:30 PM

जायकवाडीला पाणी न मिळाल्यास परिस्थिती गंभीर

गोदावरी नदीवर बांधलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये सद्य:स्थितीला क्षमतेच्या तुलनेत निम्माच साठा जमा झाला आहे. जायकवाडी प्रकल्पातून पाणी न मिळाल्यास दोन्ही जिल्ह्यांत उन्हाळ्यातील संभाव्य पाणी संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या वरच्या प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावर छत्रपती संभाजीनगरसह परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे.

दोन्ही जिल्ह्यांत यावर्षी सरासरीएवढा पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. प्रकल्प, उच्च पातळी बंधारे, मध्यम व लघु प्रकल्पातील एकूण पाणीसाठ्याची गोळाबेरीज केली तर नांदेड जिल्ह्यात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर परभणी जिल्ह्यात केवळ ४८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी नांदेड जिल्ह्यात ९२.९८ टक्के पाणीसाठा होता, तर परभणी जिल्ह्यात ८९.५९ टक्के साठा होता. नांदेड जिल्ह्यात ९ उच्च पातळी बंधारे आहेत. त्यापैकी ४ बंधारे गोदावरी नदीवर आहे. या बंधाऱ्यांत ६०.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर परभणी जिल्ह्यातील ४ बंधाऱ्यांमध्ये ५०.२८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्मा साठाही यावर्षी बंधाऱ्यांमध्ये नाही. गोदावरी नदीवरील सर्वच बंधा अर्धे रिकामे असल्याने यावर्ष पाण्यासाठी धावपळ कराव लागण्याची शक्यता आहे.

मध्यम प्रकल्पांतही ठणठणाट

• लघू आणि मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच अंशी पाण्याची समस्या मिटते. मात्र, मध्यम प्रकल्पांचीही यावर्षी अवस्था वाईट आहे.

• नांदेड जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ५६.९६ टक्के (गतवर्षी ९८.२८ टक्के), पाणीसाठा शिल्लक आहे.

• लघु प्रकल्पांमध्ये त्यापेक्षा कमी साठा आहे. प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, टंचाई आणखी वाढू शकते.

जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी

• तिन्ही जिल्ह्यांतील पाणीसाठ्याचा विचार केला तर जायकवाडी प्रकल्पातून बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडणे गरजेचे आहे. मात्र, वरच्या धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. मराठवाड्यातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती •

  • पाहता, पश्चिम महाराष्ट्रातील वरच्या धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. 

हिंगोली जिल्ह्यात ६० टक्केच पाणीसाठा

• नांदेड, परभणीबरोबरच हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती फार चांगली नाही.

• हिंगोली जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यात ४० टक्के पाणीसाठा आहे. या जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ५९.७३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात देखील यावर्षी उन्हाळ्यात टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जायकवाडीला पाणी मिळणार की नाही याबाबत आज सर्वाेच्च न्यायालायात सूनावणी होणार आहे. ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातील जलाशयांमधील पाणी पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडू नये आणि गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत.

टॅग्स :जायकवाडी धरणमराठवाडा वॉटर ग्रीडपाणीकपातपाणी टंचाई