सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सकाळी १०:३० वाजता बंद करण्यात आले आहे. सोलापूर शहरासाठी भीमा नदीवरील टाकळी व चिंचपूर बंधारे भरल्याने हे पाणी बंद करण्यात आले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी चिंचपूर बंधाऱ्यात अल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिल्याने सोलापूर महापालिकेने शहराची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती.
अधिक वाचा: वेळीच सावध व्हायला हवं, २०२३ ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष
त्यानुसार दि. ५ रोजी सायंकाळी उजनी धरणातून ५ हजार क्युसेक विसर्गाने गेली दहा दिवस पाणी सोडण्यात आले होते. दि. १७ रोजी सकाळी उजनी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. उजनी मुख्य कालव्यातून कालवा बेड लेवलपर्यंत आणखी महिनाभर पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या उजनी धरणात उपयुक्त केवळ दीड टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
चार लाख शेतकरी अवलंबून
२००३ मध्ये उजनी सर्वाधिक वजा ६५ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी खालावली होती. २०१६ मध्ये ५३.३९ टक्क्यांपर्यंत गेला होता. यावर्षीची स्थिती बघता २००३ व २०१६ प्रमाणे पाणी पातळी खाली जाण्याची शक्यता आहे. उजनी धरणावर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांतील चार लाख शेतकरी अवलंबून आहेत.
धरणात ६५.२१ टीएमसी पाणीसाठा
गतवर्षी उजनी १७ जानेवारी रोजी १०० टक्के भरलेले होते. तर ६ मे रोजी मृतसाठ्यात गेले होते. सध्या उजनी धरणात ६५.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. १.५५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. २.९० टक्के पाणी पातळी राहिली आहे.
सध्या सीना-माढा उपसा सिंचन, दहिगाव व भीमा-सीना जोड कालवा चार ते पाच दिवसांत बंद होणार आहे. उजनी मुख्य कालवा ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान बंद होईल. कालव्यातून एकूण ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. - प्रशांत माने, उजनी धरण, व्यवस्थापक