पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त ६० टक्के भरले पण धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मायनसमध्ये गेलेले धरण यावर्षी १५ जानेवारीमध्येच मायनसमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी धरणातून सध्या भीमा नदीत पाच हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग चालू असून दहिगाव सिंचन योजना १२०, सीना माढा २९७ तर बोगदाद्वारे २२१ केसेस एवढा विसर्ग चालू आहे. भीमा नदीतून सोलापूर सह सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर शहरासाठी सोडलेले पाणी १५ जानेवारीपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातील जवळपास दहा ते अकरा टक्के पाणीसाठा कमी होणार आहे. उजनी धरणातील पाण्याच्या या सुमार नियोजनाचा फटका उजनी नदीकाठच्या करमाळा, माढा, इंदापूर, दौंड, कर्जतमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.
अधिक वाचा: कोयना धरणातून २१०० क्युसेकने विसर्ग सुरू; टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांना फायदा
गेल्या वर्षी अपुऱ्या पाणी व जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना आता उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. उजनी बॅकवॉटर पट्टयात सध्या केळी या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड चालू असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र, उन्हाळ्यात उजनीचे पाणी कमी झाल्यास लाईट कपातीची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे व असे झाले तर उजनीकाठचा शेतकरी उद्ध्वस्त होणार असून त्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास एप्रिल, मे मध्ये भिषण परिस्थिती उद्भवणार आहे.
चारी खोदून पिके जगविण्याचा प्रयत्न
उजनी धरणातील पाणी वारेमाप पध्दतीने सोडण्यात आले आहे. नियोजन कोलमडल्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. करमाळा तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकर्याना चारी खोदून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
उजनीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्यानंतर काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पंपिंग करून पाणी उपसा करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावी लागणार आहे. उसासह केळी पिकांना पाणी कुठून देणार याची चिंता लागली आहे. - भारत साळुंके, पुनर्वसित शेतकरी, भिवरवाडी