Join us

मराठवाड्यातील धरणांमध्ये राहिला केवळ एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती साठा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 06, 2024 12:07 PM

धाराशिवची बहुतांश धरणे शुन्यावर,मराठवाड्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आता...

राज्यातील धरणांमध्ये उन्हाळ्याआधीच ४४.९० टक्के पाणीसाठा उरला आहे. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात आजच्या घडीला केवळ २३.३६ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. औरंगाबाद विभागातील ९२० लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता १६९६.०९ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

औरंगाबाद विभागातील ४४ लहान, मध्यम मोठ्या धरणांमध्ये आज दि ६ मार्च रोजी २६.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यात सर्वात कमी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जायकवाडीत एवढा पाणीसाठा

मराठवाड्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आता २५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आता ५४३.९९ दलघमी पाणी जायकवाडीत राहिले आहे.

बीडमधील मांजरा धरण आता अवघ्या १०.७९ टक्क्यांवर गेले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी ४१.१० व सिध्देश्वर ७५.७२ टक्के भरले आहे. नांदेड जिल्ह्यातील विष्णूपूरी धरणात आता ४६.७३ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून निम्न मनारमध्ये ३४.६१ टक्के पाणी उरले आहे.

धाराशिवमधील बहुतांश धरणे शुन्यावर

धाराशिवमधील बहुतांश धरणे शुन्यावर पोहोचली असून तेरणा धरणात ६.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच लातूरच्या भूसानी धरणात ५५.७० टक्के पाणी राहिले असून परभणी जिल्ह्यातील निम्न दुधनाधरणात आता केवळ ११.३७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

जाणून घ्या कोणत्या धरणात किती पाणी?

 

टॅग्स :धरणमराठवाडापाणीजायकवाडी धरण