Join us

आज विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज, २४ जिल्ह्यात यलो अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 28, 2023 1:19 PM

राज्यातील ३० जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट

मागील दोन दिवसात राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रात आज वादळी वा-यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील ४ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून उर्वरित राज्यातील २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आणि सलग दुस-या दिवशी झालेल्या गारपीटीमुळे रब्बी पिके आडवी झाली. 

राज्यात पुढील दोन दिवस पाऊस राहणार असून आज (मंगळवार) राज्यातील ३० जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट झाली आहे. गारपीट आणि पावसाच्या एकत्रित परिणामाने राज्यात बहुतांश ठिकाणी गारठा वाढला आहे. मुंबई व परिसरात झालेल्या पावसाने हवेची गुणवत्ता सुधारल्याचे सांगण्यात येत आहे.

आज राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तापमानात घट झाली असून कमाल व किमान तापमान घटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज २१.२ अंश एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान १९.० अंश तापमान नोंदवले गेले. हे तापमान साधारण तापमानापेक्षा ९ अंशांने घटल्याचे हवामान विभागाने सांगितले. 

पुढील दोन दिवस कुठे अलर्ट?

२९ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील  जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव मध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर, नगर मध्ये पावसाची शक्यात आहे. ३० नोव्हेंबरला नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.

टॅग्स :पाऊसतापमानरब्बीगारपीट