आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान जळगाव व नंदुरबार वगळता उर्वरित राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अजून काही दिवस सक्रीय राहणार असून राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला असला तरी पुढील पाच दिवस पावसाचा जोर काही भागांमध्ये कायम राहणार आहे.
२७ ते ३० सप्टेंबर पर्यंत राज्यात कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी राहणार असून अंदमान बेटांवर हा वेग ६५ किमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य भारतात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
बीड, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट
आज कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बहुतांश राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात सातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. आज सकाळपासून नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी असून ढगांच्या पावसाची संततधार कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ढगाळ वातावरण असून दुपारी ४ वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.