Lokmat Agro >हवामान > फळ पीक विम्याचा ‘ऑरेंज ज्यूस’ कंपनीच्याच घशात

फळ पीक विम्याचा ‘ऑरेंज ज्यूस’ कंपनीच्याच घशात

orangefarmer's crop insurance claims rejected by companies | फळ पीक विम्याचा ‘ऑरेंज ज्यूस’ कंपनीच्याच घशात

फळ पीक विम्याचा ‘ऑरेंज ज्यूस’ कंपनीच्याच घशात

विधिमंडळ अधिवेशन विशेष : विमा कंपनीने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दाेन वर्षांचे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान हाेऊनही ‘क्लेम’ नाकारले आहेत.

विधिमंडळ अधिवेशन विशेष : विमा कंपनीने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दाेन वर्षांचे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान हाेऊनही ‘क्लेम’ नाकारले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भातील शेकडाे संत्रा उत्पादक दरवर्षी संत्र्याच्या अंबिया आणि मृग बहाराचा फळ पीक विमा काढतात. विमा कंपनीने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दाेन वर्षांचे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान हाेऊनही ‘क्लेम’ नाकारले आहेत. त्यामुळे विम्याच्या हप्त्यापाेटी गाेळा करण्यात आलेला ‘ऑरेंज ज्यूस’ विमा कंपनीच्याच घशात घातला जात असताना याबाबत कुणीही बाेलायला तयार नाही.

विदर्भात एकूण १ लाख ५५ हजार हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. यातील नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक दरवर्षी माेठ्या प्रमाणात संत्र्याच्या अंबिया व मृग बहाराचा विमा काढतात. विमा कंपनीला प्रीमियमपाेटी ५० टक्के रक्कम केंद्र सरकार, ४० टक्के रक्कम राज्य सरकारन आणि १० टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून मिळते. हा विमा हवामानावर आधारित असून, प्रतिकूल हवामानामुळे संत्र्याच्या दाेन्ही बहारांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कंपनीकडून विम्याचा परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, नागपूर व अमरावती जिल्ह्यात संत्र्याच्या दाेन्ही बहारांचे नुकसान हाेऊनही विमा कंपनीने ‘क्लेम’ नाकारले आहेत.

मृग बहार विम्याचे ट्रिगर
१) कमी पाऊस
२) पावसाचा खंड

अंबिया बहार विम्याचे ट्रिगर
१) अवेळी पाऊस
२) कमी तापमान
३) अधिक तापमान
४) गारपीट

विमा कंपन्यांचा ‘स्कायमेट’साेबत करार
हा विमा हवामानावर आधारित आहे. हवामानाची इत्यंभूत माहिती व आकडेवारीसाठी विमा कंपन्यांनी ‘स्कायमेट वेदर सर्व्हिस’साेबत सामंजस्य करार केला आहे. पर्जन्यमान व हवामानाच्या माहितीसाठी स्कायमेटने ठिकठिकाणी स्वयंचलित यंत्र बसविले आहेत. स्कायमेटने दिलेली माहिती विमा कंपन्यांसह शेतकऱ्यांना मान्य करावी लागते.

‘ट्रिगर’वर आक्षेप व ‘क्लेम’ देण्यास नकार
विम्यासाठी कंपनीने दिलेले ट्रिगर आणि स्कायमेटने दिलेली आकडेवारी व माहिती शेतकऱ्यांनी मान्य केली आहे. मात्र, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नागपूर व अमरावती जिल्ह्यात संत्र्याच्या अंबिया व मृग बहाराच्या विम्याचा ‘क्लेम’ देताना स्कायमेटने दिलेल्या आकडेवारीवर आक्षेप घेतला आणि ‘क्लेम’ नाकारले आहेत. ही कंपनी राज्य सरकारचे निर्देशही गांभीर्याने घेत नाही.

संत्रा लागवड क्षेत्र (आकडे हेक्टरमध्ये)
१) अमरावती - ९०,०००
२) नागपूर - ४०,०००
३) वर्धा - १०,०००
४) उर्वरित जिल्हे - १५,०००

प्रीमियममध्ये तफावत
संत्र्याच्या मृग बहार विम्यासाठी राज्यभर प्रति हेक्टर चार हजार रुपये प्रीमियम घेतला जाताे. मात्र, अंबिया बहारासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रीमियम प्रति हेक्टर २० हजार रुपये तर अमरावती जिल्ह्याचा प्रीमियम १२ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, दाेन्ही जिल्हे शेजारी असून, तेथील हवामान सारखे आहे. इतर जिल्ह्यांमधील प्रीमियम रक्कम यापेक्षा कमी असून, सर्वाधिक रक्कम नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला दिली आहे.

विम्याबाबत शेतकरी उदासीन
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने अमरावती जिल्ह्याचा अंबिया बहाराचा सन २०२२ - २३ चा १३.९३ कोटी रुपयांचा क्लेम नाकारला असून, नागपूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ आणि सन २०२३-२४ चा मृग आणि सन २०२२-२३ चा अंबिया बहाराचा क्लेम नाकारला आहे. क्लेम नाकारले जात असल्याने शेतकरी विमा काढत नाहीत.

काेणत्या जिल्ह्यात काेणती कंपनी
जिल्हा - विमा कंपनी
नागपूर, अमरावती, यवतमाळ व वाशिम - रिलायन्स जनरल इन्शुरन्स
वर्धा व अकाेला - एचडीएफसी जनरल इन्शुरन्स
बुलडाणा - भारतीय कृषी विमा कंपनी

कंपनी अधिकाऱ्यांचे माैन
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नागपूर व अमरावती जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना किती क्लेम मंजूर केले याबाबत माहिती घेण्यासाठी या कंपनीचे जाकाेब पीटर, प्रमाेद पाटील व संजीव सहाय या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: orangefarmer's crop insurance claims rejected by companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.