Join us

लातूरमध्ये पाणीटंचाईचे सावट, लघू, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 9:24 AM

लातूर जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पात पाणीसाठ्याचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, मसलगा, घरणी या ...

लातूर जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पात पाणीसाठ्याचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, मसलगा, घरणी या आठ मध्यम प्रकल्पांत १०.६३ टक्के पाणीसाठा उपयुक्त आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे.

आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पात असलेला पाणी उपसा बंद झाला आहे. परिणामी, प्रकल्प परिसरातील शेतीला पाणी मिळत नसल्याने या पाण्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या आरक्षित केलेले पाणी केवळ पिण्यासाठी ठेवण्यात आल्याचे सिंचन विभागाकडून सांगण्यात आले.

पाणीटंचाईच्या झळा वाढल्या

ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विंधन विहिरींचे पाणी कमी होत आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

जिल्ह्यात जळकोट, देवणी, चाकूर, रेणापूर, अहमदपूर, औसा तालुक्यातील काही भागांत टंचाई वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकर व पर्यायी पाणी पुरवठा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :लातूरपाणीकपातपाणीधरण