Join us

पुढील पाच दिवस हलक्या सरींचे, शेतकऱ्यांनी पिकाची कशी घ्यावी काळजी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 08, 2023 4:30 PM

शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग..कशी घ्यावी पिकांची काळजी?

राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र असताना आता पुढील पाच दिवस राज्यातील शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत. राज्यात पुढील पाच दिवस हवामानाचा कोणताही तीव्र इशारा देण्यात आला नसून हलक्या सरींची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात तसेच राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याचे चित्र असताना पुढील पाच दिवसही पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर बांगलादेशच्या भागात चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे देशातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असली तरी महाराष्ट्रात मात्र पुढचे पाच दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने आज पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला. या अंदाजात ८ ते १२ ऑगस्ट पर्यंत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.राज्यातील बहुतांश भागात दुपारी ऊन पडत असून वातावरण ढगाळ आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात यंदा उशिरा सुरु झालेल्या पावसामुळे पेरण्या लांबल्या होत्या. कमी पाऊस झाल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. जुलैमध्येही पावसाची हवी तशी स्थिती नसल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. सरासरीपेक्षा कमी पूस होत असल्याने शेतकरी अंतरमशागतीच्या कामांना लागले आहेत. मुळातच कमी पाऊस झालेल्या भागात आता शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लाऊन बसण्याची वेळ आली आहे. 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून आलेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्याने काय करावे? 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

  • कापूस, तूर, मुग/उडीद, भुईमूग व मका पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. कापूस व तूर पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  
  • मागील काही दिवसापासून पावसाने दिलेली उघाड व ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत.  
  • मुग/उडीद व भुईमूग पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सध्याचे दमट व ढगाळ वातावरण यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी.  
  • मका पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजशेतकरीशेतीपाऊसपाणीपीकपीक व्यवस्थापनमोसमी पाऊसशेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्र