छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व शहरात गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. २६ ते ३० नोव्हेंबर या काळात रोज मध्यरात्री कमी-अधिक पाऊस शहर व परिसरात बरसला. ९ मंडळांत तुफान पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता असून पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. २६ नोव्हेंबर ६०.८ मि.मी. पाऊस झाला. ३२ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यानंतर गुरुवारी ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. ९ मंडळांत अतिवृष्टी झाली. तर शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ५८५ मि.मी. सरासरी आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबरसह वार्षिक सरासरी ६६२ मि.मी.च्या तुलनेत ९६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पूर्ण करण्यापर्यंत पाऊस झाला असला तरी तो बेमोसमी पाऊस असून त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची माती केली आहे.
ब्रिजवाडीत भिंत कोसळली
गुरुवारी अवकाळीमुळे पाण्याने सातारा परिसरात घरांना वेढा घातला, तर मिसारवाडीत अंगणवाडीत जाताना वाहत्या पाण्यातून चिमुकल्यांना वाट काढीत जावे लागले. ब्रिजवाडीत भिंत कोसळली. त्यामुळे नागरिकांनी जीव धोक्यात घालून रात्र काढली. त्वरित पाण्याचा निचरा करण्याची मागणी मुनीर पटेल, सुनील भुईगड यांनी केली आहे.