Join us

Panchganga River पंचगंगा नदीच्या पातळीत झाली इतक्या फुटांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 2:03 PM

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अधूनमधून का असेना पण जोरदार सरी कोसळत होत्या. राधानगरी, गगनबावडा व भुदरगड तालुक्यात धुवाधार पाऊस झाला.

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अधूनमधून का असेना पण जोरदार सरी कोसळत होत्या. राधानगरी, गगनबावडा व भुदरगड तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत एका दिवसातच चार फुटांनी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात दिवसभर उघडझाप सुरू असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळतात. शनिवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पाऊस असल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीची पातळी तब्बल चार फुटांनी वाढली.

सध्या पंचगंगा १४ फुटांच्या वर गेली आहे. 'कुंभी', 'कासारी', 'तुळशी', 'भोगावती' सह सर्वच नद्यांचे पाणी हळूहळू पात्राबाहेर पडू लागले आहे. पंचगंगा नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ९ फूट ८ इंच असणारी पाणीपातळी अवघ्या २४ तासांत ४ फूट ४ इंचाने वाढून शनिवारी दुपारी एक वाजता ती १४ फुटांवर गेली. १७ फुटाला राजाराम बंधारा पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.

प्रत्येक वर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होण्याअगोदर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट पहिल्या आठवड्यात काढल्या जातात. यंदा या प्लेट काढल्याने व पावसाने सुरुवात न केल्याने बंधाऱ्याजवळ पाणी पातळी एकदमच खालावली होती, परंतु गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात धुवांधार पावसाने सुरुवात केल्याने पाणीपातळीत हळूहळू वाढ होत गेली.

टॅग्स :नदीपाऊसकोल्हापूरपाणीधरण