परभणी शहर परिसरात दोन दिवसांपासून किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे. यामध्ये सोमवारी पारा १०.५ अंश सेल्सिअस होता तर मंगळवारी हेच तापमान दहा अंशाखाली आले होते. किमान तापमान मंगळवारी ९ अंश सेल्सिअस नोंद झाल्याने परभणीकरांना चांगलीच हुडहुडी जाणवली,
यंदा जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच मंगळवारी किमान तापमान दहा अंशाच्या खाली आले. शहर परिसरात किमान ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने घेतली आहे. मागील आठवड्याभरात सातत्याने किमान तापमानामध्ये घट झाली. दोन दिवसापासून शहर परिसरातील कमी होणाऱ्या तापमानामुळे विविध प्रकारच्या जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, राजगोपालचारी उद्यान आणि शहरात मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉक, व्यायामासाठीची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. आरोग्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
साडेचार अंशाची घट
मागील वर्षी याच दिवशी किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंद झाले होते तर परभणी शहरात आयएमडी नोंदीनुसार मंगळवारचे किमान तापमान हे १३.५ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे आयएमडी पेक्षा शहर परिसरातील विद्यापीठाच्या नोंदीमध्ये किमान साडेचार अंश सेल्सिअस तापमानाची घट असल्याचे दिसून आले. विद्यापीठ परिसर हिरवळीने नटला आहे. तेथील नोंद आणि शहरात होणारी आयएमडीची नोंद यात नेहमीच हा फरक जाणवतो.
आठवडाभरात असे घटले किमान तापमान
१० जानेवारी= १६.६
११ जानेवारी= १५.९
१२ जानेवारी= १४.२
१३ जानेवारी= १४.६
१४ जानेवारी= १३.४
१५ जानेवारी= १०.५
१६ जानेवारी= ९