उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आपत्कालीन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उजनी धरणातूनपाणी सोडण्यात आले आहे.
एकरूख योजनेच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणातपाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी हे पाणी दर्शनाळ फाट्याद्वारे हरणा नदीत पोहोचले असून, लवकरच हे पाणी कुरनूर धरणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात कुरनूर धरणातुन पाणी सोडल्यानंतर अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील जनतेला भविष्यकाळातील पाणीटंचाईबद्दल चिंता भेडसावत होती.
ही आपत्कालीन दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी यापूर्वीच उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एकरूख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी सोडण्याविषयी आग्रही भूमिका मांडलेली होती.
ही मागणी मान्य करत अखेर प्रशासनाने मागील आठवड्यापासूनच भीमा कालव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोडलेल्या या पाण्याद्वारे कुरनूर धरणात कमी-जास्त प्रमाणात का होईना; पण पाणीसाठा वाढणार असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
५२ गावांना पाणी मिळणार८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेल्या कुरनूर धरणात उजनी धरणातून जवळपास १६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा सोडण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३ नगरपालिकांसह ५२ गावांना पाणी मिळणार आहे.
जास्तीचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणीउजनी धरणातून एकरुख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी येते. हे पाणी तीनशे किलोमीटर पार करून येते. एकरुख योजनेचे काम अद्यापही पूर्ण क्षमतेने तयार झाले नाही. यामुळे येणाऱ्या पाण्याला अनंत अडथळे आहेत. हक्काचे तीन टीएमसी पाणी अक्कलकोट तालुक्याला देण्यासाठी संबंधित विभागाकडून जास्तीचे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
एकरुख योजनेतून उजनीचे पाणी कुरनूर धरणात सोडण्याविषयी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी केली होती. प्रशासनाकडून पाणी सोडण्यासाठी सहकार्य मिळाले. मिळालेल्या पाण्याचा वापर तालुक्यातील जनतेने जपून करावा. आगामी पावसाळा सुरू होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार
अधिक वाचा: उन्हाच्या पारा करतोय शरीरावर मारा; शेतकऱ्यांनो 'या' लक्षणांना टाळू नका