Pune Rain : पुण्यात आज दमदार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे रस्ते पाणीमय झाले आहेत. तर आज दुपारनंतर शहरामध्ये ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोनतीन वेळा चांगला पाऊस झाला आहे. नवरात्रीच्या आदल्या दिवशीच शहरामध्ये विजांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून हिंगोली, परभणी, नांदेड, रायगड, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परतीच्या पावसाला अवधी
भारताच्या उत्तर भागातून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. राजस्थान, कच्छ या भागांत परतीचा पाऊस एका आठवड्यापूर्वीच सुरू झाला आहे. पण महाराष्ट्रात अद्यापही परतीच्या पावसाची चिन्हे नाहीत अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अजून एका आठवड्यामध्ये महाराष्ट्रात परतीच्या पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चांगला पाऊस
पुढील तीन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील तीन महिन्याच्या हवामानाचा अंदाज देताना ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामातील पिकांना चांगला फायदा होऊ शकतो. फक्त अवकाळी किंवा जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहे.